Samvidhan Samman Sammelan Nagpur: नागपुरात राहुल गांधी यांच्या उपस्थितीत संविधान सन्मान संमेलन कार्यक्रम पार पडला. मात्र, यावेळी ओबीसी समाजातील विविध संघटनांनी या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळालं. त्यांना व्यासपीठावर जागा न मिळाल्याने रोष व्यक्त करण्यात आला आहे.
या संमेलनाची जबाबदारी विरोधी पक्ष नेते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांनी घेतली होती. मात्र, यावेळी इतर संघटनांच्या नेत्यांचा डावलण्यात आल्याने अकेन संघटनांचे कार्यकर्ते नाराज झाले होते. काही संघटनांनी तर या संमेलनावरच बहिष्कार टाकला. तसेच, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनीही संमेलनात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना या संमेलनासाठी गर्दी जमवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, जेव्हा भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन ‘लाल पुस्तिका’ दाखवली, तेव्हा त्यांना फार कमी प्रतिसाद मिळाला. त्यावरुन राहुल गांधी यांनी आयोजकांची कानउघडणी केल्याची चर्चा कार्यक्रमाला उपस्थित असेलेल्यांमध्ये सुरु होती.
या कार्यक्रमात महिलांच्या हक्कासाठी घोषणा देण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्षात महिलांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही. त्यामुळे उपस्थितांमधून नाराजीचा सूर उमटला. काही महिला कार्यकर्त्यांना व्यासपीठावर बोलावून पुन्ह खाली बसवण्यात आलं. त्यावर महिलांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनीही आक्षेप घेतला आहे. “महिलांवर अन्याय करून, घोषणा देण्याचा हा कुठला न्याय?”, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तर, महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांनाही या कार्यक्रमाची चाहूल लागल्यामुळे ते अलिप्त राहिले, अशीही चर्चा होती.