Ajit Pawar: योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक रहेंगे तो नेक रहेंगे’ घोषणांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंग तो कटेंगे’वर महायुतीत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आक्षेप घेतला आहे. हा प्रदेश छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराजांचा आहे. राज्याबाहेरचे लोक येऊन असे विचार मांडतात. अन्य राज्यांच्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवावं त्यांना काय बोलायचं आहे, असं अजित पवार म्हणाले.
महायुती म्हणून सोबत काम करत असलो तरीही आमच्या पक्षांच्या विचारधारा वेगळ्या आहेत. आम्ही किमान समान कार्यक्रम आखून त्यावर सरकार चालवत आहोत, असं अजित पवारांनी सांगितलं. आम्ही आजही शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांवर चालतो. अन्य राज्यांमध्ये अशा घोषणा चालत असतील. महाराष्ट्रात त्या चालणार नाहीत. त्यामुळे भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवावं त्यांना काय बोलायचं आहे, अशी पुस्ती पवारांनी जोडली.
शिंदेसेनेचे नेते आणि दिंडोशीचे उमेदवार योगी आदित्यनाथ यांनी मात्र योगींच्या घोषणेला पाठिंबा दर्शवला. आपण वेगळे झाल्यावर कमजोर होतो. त्यामुळे एकजूट राखायला हवी. ती राखल्यास मजबूत राहू, असं योगीजी म्हणतात. कदाचित आज ही बाब अजित पवारांना समजत नसेल. पुढे ती त्यांना समजेल, असं संजय निरुपम म्हणाले. ‘बटेंगे तो कटेंगे’ ही घोषणा नक्कीच काम करेल. अजित दादांना ती समजून घ्यावी लागेल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काहीही चुकीचं बोलत नाहीत. काहींनी त्यांचे विचार कळायला वेळ लागू शकतो, असं निरुपम पुढे म्हणाले.