Thane Vidhan Sabha Campaign Rally: वहिनी प्रचारयात्रेला येणार आहेत…दादांची बाईक रॅली संध्याकाळी निघणार आहे….ताईंसोबत महिला घरोघरी पत्रक वाटायला जाणार आहेत, असे संवाद सध्या ठाण्यात सर्वपक्षीय कार्यालयात घुमत आहेत.
चौकारासाठी प्रयत्नशील
ओवळा-माजिवडा मतदारसंघातून सलग तीन टर्म प्रताप सरनाईक विधानसभेवर निवडून गेले आहेत. यंदा विजयी चौकार मारण्यासाठी या मतदारसंघात पायाला भिंगरी लावून सरनाईक फिरत असताना त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका परिषा सरनाईक, सुपुत्र माजी नगरसेवक पूर्वेश, विहंग, सुना अनाहिता व डॉ. कश्मिरा यांनीही प्रचारयात्रांना हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे, रेयांश, विरहान, समर हे सरनाईक यांचे नातू प्रचार रथावर कुटुंबासोबत दिसत असल्याने सरनाईक कुटुंबाची तिसरी पिढी प्रचाररॅलीत सहभागी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी – पाचपाखाडी मतदारसंघातही त्यांच्या पत्नी लता शिंदे, स्नुषा वृषाली शिंदे, बंधू प्रकाश शिंदे यांनी प्रचार फेऱ्यांमधून नागरिकांशी संवाद साधला आहे.
विजयासाठी जीवाचे रान
लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी माजी खासदार व ठाणे शहर मतदारसंघाचे शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार राजन विचारे प्रयत्नशील आहेत. संमिश्र लोकवस्तीच्या या मतदारसंघात विचारे यांच्या पत्नी माजी नगरसेविका नंदिनी विचारे, कन्या युवासेनेच्या सहसचिव धनश्री विचारे व माजी नगरसेवक पुतणे मंदार विचारे नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत. दुसरीकडे ओवळा-माजिवडा मतदारसंघांचे शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार नरेश मणेरा यांचे सुपुत्र मितेश मणेरा, कन्या हिनाली मणेरा प्रचारासोबतच प्रचाराच्या नियोजनात लक्ष देत असून कार्यकर्त्यांशी चर्चा करताना दिसत आहेत.
नागरिकांशी चर्चा, महिलांशी संवाद
मुंब्रा-कळवा विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस (शप) उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांनी मतदारसंघातील कळवा, मुंब्रा परिसरात प्रचारयात्रांवर भर दिला आहे. गल्लीबोळात पायी फिरून आव्हाड यांच्या कामाचा अहवाल, प्रचारपत्रके वाटप करताना नताशा या भागातील नागरिकांशी संवाद साधत आहेत. तसेच महिलांशी चर्चा करताना त्यांचे प्रश्नही नताशा जाणून घेत आहेत. या मतदारसंघातील जितेंद्र आव्हाड यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला यांच्यासाठी मुंब्र्यातील नातेवाईक, आप्तेष्ट प्रचारात सक्रिय झाले असून सर्वत्र काटे की टक्कर असल्याने प्रत्येकजण आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी जीवाचे रान करत आहे.