Ashok Pawar Commented on Son Rushiraj Pawar Case: पुण्यातील शिरुरचे आमदार अशोक पवार यांचे पुत्र ऋषीराज पवार याचं अपहरण करुन त्याला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सर्व प्रकारावर आमदार अशोक पवार यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत आपली प्रतिक्रिया मांडली आहे.
अशोक पवारांनी मुलासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत निषेध व्यक्त केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी
‘दुर्दैवी.. दुःखद.. वेदनादायी.. घृणास्पद.. निंदनीय..’ अशा पाच शब्दांत घटनेबद्दल प्रतिक्रिया मांडली.
व्हिडीओच्या माध्यमातून अशोक पवार म्हणाले, आज दुर्दैवी घटना घडली, घृणास्पद म्हणजे विरोधी माणसं कुठल्या थरापर्यंत जातात. आज माझ्या मुलाला मोटारसायकलवर असताना एकाने प्रचार करण्यासाठी जवळच्या वस्तीत नेलं, तिथं गेल्यावर त्याला कोंडलं. त्याचा गळा पट्टीनं की फडक्यानं आवळण्यात आला. त्याला सांगितलं तू कपडे काढ, एका महिलेला विवस्त्र करुन अत्यंत घृणास्पद प्रकार केला.
‘आमच्या जीवनामध्ये आम्ही जे चांगलं वागतो, समाजाशी एकरुप होतो. पण या घटनेने मनाला वेदना झाल्या, विरोधक कुठल्या थराला जाणार आहेत ही लोकं, अशी भावनाही अशोक पवारांनी व्यक्त केली.
पवार पुढे म्हणाले, ‘या घटनेनंतर काही लोकं भेटायला आले. ते म्हणाले, बापू त्या पोरांना माफ करा. पण अरे काय चाललंय, हा प्रकार काय आहे. खरं म्हणजे आमच्या सारख्याचं मन एकदम बेचैन झाले आहे. लोकशाहीत निवडणूक लोकशाही पद्धतीनं तुम्ही लढा, असे घृणास्पद प्रकार करुन आमच्या कुटुंबाला वेठीस धरायचं आहे का, अत्यंत निंदनीय ही गोष्ट आहे. म्हणजे काळ यांना माफ करणार नाही.’
पोलीस खात्याला विनंती करत पवार म्हणाले की, या प्रकरणाची बारकाईने चौकशी करा, याचा कोण सूत्रधार आहे हे शोधला पाहिजे, समाज यांना माफ करणार नाही. या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना की ज्यांना कुणी असं कृत्य करण्यास भाग पाडलं असेल तो खरा माणूस शोधणं पोलीस खात्याचं लक्ष्य असलं पाहिजे. कारण यांना माफ केलं नाही पाहिजे. ‘कुटुंबाला बदनाम करणं दु:खद अशी घटना आहे,’ असेही अशोक पवार म्हणाले.