Sadabhau Khot: २०१२ मध्ये माझ्या एन्काऊंटर डाव आखण्यात आलेला होता, असा खळबळजनक दावा आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यानं राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.
‘२०१२ ला इंदापूरला ऊसाचं आंदोलन सुरु होतं. वसवडे गावात चंद्रकांत नलावडे हा शेतकरी मजुराचा मुलगा, तो टेम्पोच्या आडोशाला राहून आंदोलन बघत होता. समोरुन जाऊन त्याला गोळी घालण्यात आली. त्यावेळी मला येरवड्याच्या तुरुंगात ठेवलं होतं. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवर शेतकरी उतरले होते. तेव्हा मला पोलिसांचा निरोप आला, तुमचा जामीन तुम्ही स्वीकारा. बाहेर येऊन तुम्ही शांततेचं आवाहना करा. मी जामीन स्वीकारला, बाहेर आलो. बाहेर पोलिसांच्या तीन-चार टोयॉटो कार लागलेल्या होत्या. यात बसा, यात बसा, असं पोलिसच मला सांगत होते. यांनी माझ्यासाठी इतक्या चांगल्या गाड्या कशासाठी आणल्या, असा प्रश्न मला पडला,’ अशा शब्दांत १२ वर्षांपूर्वी घडलेली घटना खोत यांनी सांगितली. त्यावेळी राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार होतं.
‘मी आज त्या डीवायएसपीचं नाव घेणार नाही, कारण तो आता ऍडीशनल एसपी आहे. त्याच्या नोकरीवर मला गंडांतर आणायचं नाही. त्यानं मला चालत चालत हळूच सांगितलं, भाऊ जिथे जिथे आंदोलनात दंगल चाललीय, अशा एक दोन पॉईंटवर न्यायचंय आणि तुमचा एन्काऊंटर करायचाय. तुम्ही प्लीज या गाडीत बसू नका. मग मी दौंडच्या कार्यकर्त्याच्या गाडीत बसलो. सगळ्या रस्त्यारस्त्याला मला अडवलं गेलं होतं,’ असा दावा खोत यांनी केला आहे.
२०१२ मध्ये नेमकं काय घडलं होतं, तेव्हा परिस्थिती नेमकी कशी होती, हेदेखील खोत यांनी सांगितलं. ‘त्यावेळी आमच्याकडचे कारखानदार प्रचंड चिडलेले होते. ५००-६०० रुपये असलेला ऊसाचा दर आम्ही २५०० ते ३००० रुपयांवर नेला होता. त्यामुळे कारखानदार संतापले होते. कारखानदारांच्या सत्तेला सुरुंग लागणार होता,’ असं खोत यांनी सांगितलं. २०१२ मध्ये खोत राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत होते.