Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana: राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि सत्ताधारी व विरोधक यांच्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत.
हायलाइट्स:
- लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिलांचे फोटो आम्हाला पाठवा
- त्या लाडक्या बहिणींची आम्ही व्यवस्था करू
- खासदार धनंजय महाडिक यांचं वादग्रस्त वक्तव्य
घ्यायचं शासनाचं आणि गायचं त्यांचं…
खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसवर टीका करताना महायुतीने देखील काय केलं हे सांगत असताना, ”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या सभेत आणि रॅलीत दिसले. तर त्यांचे फोटो काढा आणि आम्हाला पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करतो”, अशा शब्दात लाडक्या बहिणींना एकप्रकारे दमच भरला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ”या ठिकाणी काँग्रेसची रॅली निघाली, तर त्या रॅलीमधील महिलांचे फोटो काढा. लाडकी बहीण योजनेतून ज्या महिला १५०० रुपये घेतात, त्यांचे फोटो काढून आम्हाला द्या. घ्यायचं शासनाचं आणि गायचं त्यांचं असं अजिबात चालणार नाही. अनेक ताई आहेत ज्या छात्या बडवून सांगत आहेत की, आम्हाला या योजनेचे पैसे नकोत. जर पैसे नको असतील, तर राजकारण का करताय? असा सवालही त्यांनी केला. ज्यांना या योजनेचे पैसे नकोत, त्यांना म्हणायचं या फॉर्मवर सही कर, उद्यापासून लाडक्या बहीण योजनेचे पैसे बंद”, असंही धनंजय महाडिक यांनी महिलांना म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यासह विजय वडेट्टीवार आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
महाडिकांचा कोल्हापूरशी काहीही संबंध नाही
काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी या वक्तव्याचा निषेध करताना, ”या राज्यात विरोधकांच्या सुनेला देखील साडीचोळी देऊन पाठवण्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिला आहे. या महाराष्ट्राला एक वेगळा इतिहास आहे. धनंजय महाडिक यांनी गेल्या वेळेस देखील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांचा अपमान केला होता. आता पुन्हा एकदा महिलांचा बंदोबस्त करू व्यवस्था करू असे म्हणत अपमान करत आहेत. महाडिक यांची पार्श्वभूमी कोल्हापूरकरांना माहिती आहे. गुंडगिरीची भाषा आणि या भाषेतून दहशत पसरवणे हा एकमेव अजेंडा महाडिक कंपनीचा राहिला आहे. मात्र, कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे असल्या धमकीला कोल्हापूरची माता-भगिनी घाबरणार नाही. ते १५०० रूपये घरातले पैसे दिल्यासारखे बोलत आहेत. १५०० रुपये दिले आहेत आमच्या सोबत या, छाती बडवून घेत म्हणत आहे. आमची सुरक्षा द्या म्हणत आहेत. त्यांना महिलांना कोणतीही सुरक्षा देण्याचं मनामध्ये नाही. मुळात महाडिक हे कोल्हापूरचे नाही, कोल्हापूरशी त्यांचा काहीही संबंध नाही. ते पर जिल्ह्यातले आहेत. त्यामुळे शाहू, फुले, आंबेडकर, ताराराणी यांचा वारसा ते सांगू शकत नाही. या मातीचा गुण काय आहे त्यांना माहिती नाही. त्यांच्या या वक्तव्याचा मी आणि काँग्रेस जाहीर निषेध करतो” असे सतेज पाटील म्हणाले आहेत.
स्पष्टीकरण देत माता भगिनींची माफी
तर खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसकडून विरोध होऊ लागल्यानंतर स्पष्टीकरण देत माता भगिनींची माफी मागितली आहे. ”माझे हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनींचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हते. तर निवडणूक काळात राजकीय प्रचार करताना, विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडणाऱ्या महिलांना, लाडकी बहीण योजना ही फक्त महायुती सरकारमुळेच यशस्वी झाली असल्याचे ठाम पणे नमूद करताना चुकून आलेली प्रतिक्रिया आहे. नेहमीप्रमाणे काँग्रेसने माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या निवडणुकीत गेमचेंजर आणि अतिशय पॉप्युलर योजना आहे. महाराष्ट्रात दोन करोड तीस लाख महिलांना याचा लाभ झाला आहे. कोल्हापुरात साडेदहा लाख महिलांना लाभ मिळाला आहे. काँग्रेसचे यापूर्वी त्यांच्या सत्ता असलेल्या राज्यात ज्या योजना जाहीर केल्या त्या आता सुरू नाहीत. यामुळे आजच्या भाषणात माझ्याकडून काँग्रेस फेक नरेटिव्ह सेट करण्याच प्रयत्न करत आहे” असं खासदार धनंजय महाडिक म्हणाले.