Uddhav Thackeray Latur Tour Bags check : बॅग तपासणी अधिकारी उद्धव ठाकरे यांच्या बॅगांच्या दिशेने सरसावताच उद्धव ठाकरेंनी त्यांना ‘नाही नाही नाही दादा.. पहिलं आयकार्ड’ म्हणत थांबवलं आणि त्यांचं नाव विचारलं
व्हिडिओमध्ये काय?
बॅग तपासणी अधिकारी उद्धव ठाकरे यांच्या बॅगांच्या दिशेने सरसावताच उद्धव ठाकरेंनी त्यांना ‘नाही नाही नाही दादा.. पहिलं आयकार्ड’ म्हणत थांबवलं आणि त्यांचं नाव विचारलं. सगळ्यांना त्यांची अपॉईंटमेंट लेटर दाखवायला सांगत आपापली पाकिटं दाखवायला सांगितली. तुमच्या खिशात किती पैसे आहेत? असा प्रश्नही विचारला. एक-एक करुन प्रत्येकाची नावं आणि विभाग विचारले. सगळे जण महाराष्ट्रातले आहात का? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारला.
मीच पहिला गिऱ्हाईक का?
कधीपासून तपासणी करत आहात? कोणाकोणाच्या बॅगा तपासल्या? पटापट नावं सांगा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर कर्मचाऱ्यांनी साहेब तुमचीच पहिली सभा आहे, असं उत्तर दिलं. त्यावर ‘माझी पहिलीच? दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक का?’ असंही ठाकरे म्हणाले. मोदींच्या तपासायला कुणाला पाठवलं आहे का? सोलापूर एअरपोर्ट बंद आहे. ओदिशामध्ये ज्यांनी मोदींना तपासलं, त्यांना सस्पेंड केलं होतं.
जो न्याय मला, तोच मोदींनाही हवा
पोलीस दादा या, तुमचा पण फोटो काढतो, काय तपासायचं आहे? बॅग तुमच्याकडे ठेवता का? की पुढील मुक्कामी घेऊन जाता? मला प्रॉब्लेम नाही.. असं मिश्कीलपणे उद्धव ठाकरे बोलताना ऐकू येतं. अरे बघा.. लाजू नका.. सगळ्यांची नावं आलीत, टीव्हीवर छान प्रसिद्धी मिळणार आहे. माझा तुमच्यावर राग नाही, जो न्याय मला, तोच मोदींनाही हवा, कारण तेही प्रचारसभेला आले आहेत. काळजी करु नका, आनंदात रहा, महाराष्ट्रातले आहात ना? महाराष्ट्रासाठी जगायचं आणि महाराष्ट्रासाठी मरायचं, इतर राज्यातील लोकांच्या नोकऱ्या चाकऱ्या करायच्या नाहीत, अशी सूचनाही ठाकरेंनी केली.
“तुमच्या कलेक्टर साहेबांचे नाव काय?” असा प्रश्न सुरुवातीला उद्धव ठाकरे विचारताना एका व्हिडिओमध्ये ऐकू येतात. वर्षा ठाकूर ताई असं कर्मचाऱ्यांनी उत्तर दिल्यावर बरं ठीक आहे, जय महाराष्ट्र असं म्हणून ठाकरे निघाले.