Sharad Pawar attack on Chhagan Bhujbal at Yeola Rally: राष्ट्रवादीचे शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील प्रचारसभांच्या माध्यमातून अजितदादांसोबत गेलेल्या आमदारांवर निशाणा साधत आहेत. यातच शरद पवारांच्या जवळचे मानले जाणाऱ्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही पवारांची साथ सोडून अजित पवार गटाची वाट धरल्याने पवारांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.
येवल्यातील मतदारांना साद घालताना पवारांनी छगन भुजबळांबाबतीत केलेले विधान पुन्हा गिरवले आहे. ते म्हणाले, ‘मागे मी येवल्यात आलो असता, मी जाहीरपणे सांगितले होते की आमच्याकडून चूक झाली.’ तर ‘भुजबळांना महाराष्ट्राच्या विधानसभा, विधानपरिषदेत संधी दिली, विरोधी पक्षनेते पद दिले. पण, त्यांनी काही उद्योग केले, त्यांना पद सोडावं लागलं, तुरुंगात गेले, त्यांना भेटायला कोणीच जात नव्हते. माझी मुलगी, आम्ही त्यांना भेटायला गेलो. त्यांना आम्ही पुन्हा संधी दिली आणि तुम्ही त्यांना निवडूनही दिले. तेव्हा मुंबईतील शिवाजी पार्कवर संमेलन घेतले होते, त्याचे अध्यक्षपद भुजबळ यांना दिले.’ असेही पवारांनी अधोरेखित केले.
शरद पवारांनी पुढे पक्षफुटीच्या वेळची स्थितीही सांगितली आहे. ते म्हणाले, आमच्या सहकाऱ्याने पक्ष फोडला, तेव्हा भुजबळ सकाळी आले, जे झालं ते वाईट झालं, समजूत काढायला जाऊ का असं मला विचारलं. पण त्यानंतर भुजबळ साहेब गेले ते परत आलेच नाही, दुसऱ्या दिवशी शपथच घेतली. तसेच ‘एखाद्या माणसानं चुकीचे काम करताना काही मर्यादा असतात, त्या भुजबळ यांनी शिल्लक ठेवल्या नाहीत, अशा लोकांना पुन्हा निवडुन द्यायचं नाही हा विचार तुम्ही करायचा आहे. इथे अनेक लोक इथे आले आहेत, ज्यांनी नेतृत्वाला फसवले, असे म्हणत शरद पवारांनी छगन भुजबळांच्या होमग्राउंडवर त्यांना लक्ष्य केले.