Maharashtra Assembly Election 2024: शिंदखेडा (जि. धुळे) येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दादासाहेब रावल नॉलेज सिटीमधील श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल मैदानावर शहा यांची बुधवारी दुपारी सभा झाली.
हायलाइट्स:
- बाळासाहेबांच्या विचारांना उद्धव यांनी तिलांजली दिल्याची टीका
- ‘मविआ म्हणजे विनाश, महायुती म्हणजे विकास’ असल्याचा दावा
- राज्यात पुन्हा महायुतीच सत्तेवर येणार असल्याचा शहा यांचा विश्वास
‘महाविकास आघाडी म्हणजे ‘औरंगजेब फॅन क्लब’ आहे, तर महायुती सरकार हेच छत्रपती शिवाजी महाराज व सावरकरांच्या विचारांवर चालणारे सरकार आहे. महाविकास आघाडी म्हणजे विनाश, तर महायुती म्हणजे विकास’ असे शहा म्हणाले. शिंदखेडामध्ये ज्यांनी दंगल घडवली अशा लोकांना महाविकास आघाडी प्रोत्साहन देत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. ‘भाजपने ३७० कलम रद्द केले. आता दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी स्वर्गातून परतल्या तरी जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम पुन्हा बहाल केले जाणार नाही’, असेही शहा यांनी बजावले.
‘हरियाणात काँग्रेसने खोटी आश्वासने दिली. तिथे काँग्रेसचा सुपडासाफ झाला, ’याकडे शहा यांनी लक्ष वेधले. ‘महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येताच लाडक्या बहिणींना २१०० रुपये दरमहा दिले जाणार आहेत. मोदींनी ‘महान भारता’साठी मोहीम चालवली आहे, त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे, असेही शहा म्हणाले.
यावेळी उमेदवार आमदार जयकुमार रावल, धुळे ग्रामीणचे उमेदवार राम भदाणे, साक्रीच्या उमेदवार आमदार मंजुळा गावित, शिरपूरचे उमेदवार आमदार काशीराम पावरा यांच्यासह माजी मंत्री अमरीशभाई पटेल, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे आदी उपस्थित होते.