Devendra Fadnavis: विधानसभा निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत एका घोषणेवरुन महायुतीत जुंपली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या ‘बटेंगे तो कटेंगे’वरुन महायुतीमध्येच ‘बटवारा’ झालेला आहे.
योगी आदित्यनाथांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’च्या घोषणेचं फडणवीसांनी समर्थन केलं. ‘समाजाची विभागणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. योगीजी म्हणाले, बटेंगे तो कटेंगे. हा तर भारताचा इतिहास राहिला आहे. भारत जेव्हा जेव्हा जात, प्रांत, भाषांमध्ये विभागला तेव्हा तेव्हा भारत गुलाम बनला. त्यामुळे बटेंगे तो कटेंगेमध्ये काहीच गैर नाही. त्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेला एक है तो सेफ है हा मूलमंत्र जास्त महत्त्वाचा आहे. काँग्रेसकडून समाजाला तोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्याविरोधात मोदींनी दिलेली घोषणा महत्त्वाची आहे. राज्यातील जनता नक्कीच या घोषणेला साथ देईल,’ असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
तुमचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अशोक चव्हाण, आमदार पंकजा मुंडे यांना ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा कळली नाहीए का, असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. ‘अजित पवार, अशोक चव्हाण यांची विचारधारा वेगळी राहिलेली आहे. ते वेगळ्या विचारसरणीच्या पक्षातून आलेले आहेत. अनेकदा मला असं वाटतं की ते ज्या विचारधारेतून आले आहेत, त्यामुळे त्यांच्या डोक्यातून कधी कधी स्युडो सेक्युलरिजम बाहेर येतं. योगींच्या बटेंगे तो कटेंगेचा अर्थ त्यांना कळलेला नाही. पण आम्ही त्यांना लवकरच समजवू. मी पंकजा मुंडेंशीदेखील बोललो. तर त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं, विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जिंकत आहोत. त्याबद्दल त्यांच्या मनात कोणतीही शंका नाही,’ असं फडणवीस म्हणाले.