Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर शहरातील रस्त्यांच्या कामांवर आतापर्यंत एक हजार कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करण्यात आला आहे. त्यात राज्य सरकारच्या निधीचा वाटा मोठा आहे.
आमदार – खासदारांच्या निधीतून देखील बऱ्याच रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत, पण ही कामेअंतर्गत रस्त्यांची आहेत. स्मार्ट सिटीच्या निधीतून शहरातील १११ रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी ३१३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. ‘स्मार्ट सिटी’कडे एवढा निधी नसल्यामुळे सिटी बससाठीची दोनशे कोटींची ठेव प्रशासनाने मोडली. सिटीबसचे दोनशे कोटी रुपये रस्त्यांच्या कामांसाठी वळवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ९२ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामांसाठी निधीचा प्रश्न निर्माण झाला आहे. किमान ३५ कोटी रुपयांचा निधी मिळाल्यास उर्वरित रस्त्यांची कामे पूर्ण होतील असे मानले जात आहे.
या कामांसाठी ‘स्मार्ट सिटी’कडे निधी नसल्यामुळे आणि महापालिकेकडे निधीची वानवा असल्यामुळे सरकारकडे निधी मागण्याचा निर्णय महापालिका व ‘स्मार्ट सिटी’च्या व्यवस्थापनाने घेतला आहे. त्यासाठीचा प्रस्तावदेखील सरकारला पाठवण्यात आला असून, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर या प्रस्तावाबद्दल सरकार विचार करील, असे मानले जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रस्तावाबद्दल सकारात्मक विचार करण्यात येईल, असे संकेत सरकारकडून मिळाले आहेत. सरकारने निधी दिल्यावर रस्त्यांची नियोजित कामे पूर्ण होऊ शकतील. विकास योजनेतील रस्त्यांच्या कामांसाठी मात्र प्रतीक्षा करावी लागणार आहे.