Devendra Fadnavis: विधानसभा निवडणुकीचं मतदान अवघ्या काही तासांवर आलेलं असताना भारतीय जनता पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप झालेला आहे.
विनोद तावडे ५ कोटी रुपये वाटायला येणार असल्याची माहिती मला भाजपच्याच नेत्यांनी दिली होती, असा दावा करत ठाकूर यांनी खळबळ उडवून दिली. यानंतर शिवसेना उबाठा गटाच्या नेत्यांनी यामागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा संशय व्यक्त केला. गृह खात्यानं पाळत ठेवून तावडेंना पद्धतशीरपणे यात अडकवलं, असं खासदार संजय राऊत म्हणाले. तावडेंसोबत आज घडलेला प्रकार पाहून भाजपच्या काही नेत्यांना आनंद झाला असेल, असं राऊतांनी म्हटलं.
‘भाजपचा राष्ट्रीय महासचिव अशा प्रकारे पैसे वाटताना पकडला जातो. विनोद तावडे भविष्यात डोईजड होतील या भीतीमधून ही कारवाई करण्यात आली. तावडे बहुजन समाजातून येतात. एका बहुजन नेत्याला संपवण्यासाठी हा प्रकार घडवून आणण्यात आला,’ असा गंभीर आरोप राऊत यांनी केला. यामागे फडणवीसच असल्याचं त्यांनी सुचवलं.
आता या संपूर्ण प्रकरणावर खुद्द उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. ‘विनोद तावडे विरारमध्ये केवळ कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते. त्यांच्याकडे कोणताही पैसा, आक्षेपार्ह वस्तू सापडलेल्या नाहीत. उलट त्यांच्यावरच हल्ला झालेला आहे. आमचे नालासोपाऱ्याचे उमेदवार राजन नाईक यांच्यावर हल्ला झालेला आहे. उद्या होणारा पराभव दिसू लागल्यानं महाविकास आघाडीच्या इको सिस्टिमनं पराजय कव्हर करण्यासाठी कव्हर फायरिंग केलं आहे. या प्रकरणात विनोद तावडे कुठेही दोषी नाहीत. त्यांनी कोणतेही पैसे नेले नाहीत, कुठलेही पैसे वाटले नाहीत. कोणतेही पैसे त्यांच्याकडे मिळालेले नाहीत,’ असं म्हणत फडणवीसांनी तावडेंना एकप्रकारे क्लीन चिट दिली.