Parli Vidhan Sabha Outrage Spark: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार धनंजय मुंडेंनी शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनीच दहशत माजवली असल्याचा आरोप केला. तर देशमुख पिता-पुत्रांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली. यानंतर आता राजेसाहेब देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत मुंडेंच्या आरोपांचे खंडन केले आहे.
राजेसाहेब देशमुख म्हणाले की, धनंजय मुंडे यांच्या गुंडांनीच ईव्हीएम मशीन फोडल्या होत्या. सध्या बिहारपेक्षा जास्त गुंडगिरी येथे सुरु आहे. यातच बँक कॉलनी परिसरात असलेल्या मतदान केंद्रावर मतदान केंद्रावरील सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे कनेक्शन देखील बंद करण्यात आले होते. दरम्यान माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली आणि बुथची तोडफोड देखील धनंजय मुंडेंच्या लोकांनीच केली. पण माझ्या मुलावर आणि पुतण्यावर गुन्हे दाखल केले. लोकशाही मार्गाने मतदान झालेले नाही. यामुळे 22 संवेदनशील अशा मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणी देखील राजेसाहेबांनी केली आहे.
परळीत शरद पवारांच्या नेत्याला मारहाण, राजेसाहेब देशमुखांकडून धनंजय मुंडेंचा समाचार, फेर मतदानाचीही केली मागणी
राजेसाहेब पुढे म्हणाले, परळी तालुका आणि शहरामध्ये फेर मतदान घेण्यात यावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. चोराच्या उलट्या बोंबा, अशातला हा प्रकार आहे. सर्व साम्राज्य त्यांचेच आहे, पोलीस, महसूल, प्रशासन त्यांच्यासोबत आहे. एवढी अराजकता या शहरात कधीच झाली नाही, यामुळे लोक भयभीत झाले आहे. तर ‘सत्तेचा वापर करून सर्व सामान्य लोकांना उध्वस्त करण्याचे काम सुरू आहे. आमच्या सोबत माणूस आला नाही पाहिजे याची सर्व खबरदारी घेतली गेली होती. बिहार सुद्धा लाजेल, अशी गुंडगिरी सुरु आहे, अशी घणाघाती टीका देखील राजेसाहेबांनी केली.