Authored byकरिश्मा भुर्के | Contributed by जितेंद्र खापरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 21 Nov 2024, 11:05 pm
Nagpur News : विधानसभा निवडणुकीआधीच काँग्रेसने आपल्या विजयी उमेदवारांसाठी खास रणनीती आखली आहे. यासाठीची जबाबदारी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे देण्यात आली आहे.
मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये स्पर्धा दिसत असून दोन्हीपैकी कोणतीही युती जिंकू शकते. आपले अंदाज आणि एक्झिट पोल लक्षात घेऊन काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीला विशेषत: काँग्रेसला विदर्भातील निकालांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. विदर्भात काँग्रेस आणि मित्रपक्षांनी ७ जागा जिंकल्या होत्या. लोकसभेच्या अनुषंगाने विधानसभा निवडणुकीतही असेच निकाल लागतील अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणुकीत ३५ ते ३८ जागा जिंकण्याची काँग्रेसला आशा आहे.
काँग्रेसच्या या रणनीतीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे विजयी उमेदवारांशी संपर्क साधण्याची आणि निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांचे संघटन करण्याची जबाबदारी सोपवली आहे. विशेषतः, मतदानानंतर काँग्रेसने निर्णय घेतला आहे की, भाजपला काँग्रेसच्या आमदारांपर्यंत पोहोचता येऊ नये आणि सरकार स्थापनेसाठी अडचण येऊ नये, यासाठी काँग्रेसने एअरलिफ्टची योजना आखली आहे, यानुसार विजयी आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित स्थळी हलवले जाईल.
विधानसभा निकालापूर्वीच काँग्रेस सावध, विजयी आमदारांना एअरलिफ्ट करणार; विजय वडेट्टीवारांकडे जबाबदारी, कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने आपल्या आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी एअरलिफ्ट करण्याची योजना आखली आहे. भाजपला त्या आमदारांपर्यंत पोहोचता येऊ नये आणि सरकार स्थापनेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी त्यांना सुरक्षित स्थळी नेण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. आघाडीला बहुमत मिळाले किंवा सरकार स्थापनेच्या स्थितीत आल्यास काँग्रेस आपल्या आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी घेऊन जाईल अशी माहिती आहे.