BJP and Congress Allies Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीचा निकाल आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यात घडलेल्या अभूतपूर्व घडामोडी पाहता मतदार कोणाला कौल देणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
भाजपचा पराभव व्हावा ही तर मित्रपक्षांची इच्छा
भाजपनं लोकसभेवेळी अब की बार चारसो पारचा नारा दिला. पण भाजपची गाडी २४० जागांवर थांबली आणि मित्रपक्षांचा भाव वधारला. पाठिंब्यांच्या बदल्यात जेडीयू, टिडीपी यांनी अटी घातल्या. त्यांनी अर्थसंकल्पातून आपापल्या राज्यांना चांगला निधी मिळेल, याची सोय केली. टिडीपीच्या चंद्राबाबू नायडूंनी आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी १५ हजार कोटींचं अर्थसहाय्य केंद्राकडू मिळवलं. पूर्वोदयाच्या अंतर्गत बिहारला केंद्रानं मोठा निधी दिला. या माध्यमातून भाजपनं नितीश कुमार यांच्या जेडीयूला खूष केलं.
लोकसभा निकालात झटका बसल्यानंतर भाजप मित्रपक्षांना मान देऊ लागला. पण हरयाणा विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपचा सूर थोडा बदलला. महाराष्ट्रात जागावाटपात तो सूर पाहायला मिळाला. आता भाजपनं महाराष्ट्र गमावल्यास एनडीएतील मित्रपक्षांचा भाव वधारेल. २०२५ मध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. भाजपला महाराष्ट्रात धक्का बसल्यास नितीश कुमार बिहारमध्ये भाजपवर जागावाटपात कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतील.
काँग्रेसचा पराभव व्हावा ही तर मित्रपक्षांचीच इच्छा
भाजपच्या मित्रपक्षांप्रमाणेच काँग्रेसच्याही मित्रपक्षांची इच्छा आहे. झारखंडमध्ये काँग्रेस सत्तेतला ज्युनियर पार्टनर आहे. तर मविआमध्ये काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष आहे. लोकसभेला काँग्रेसनं राज्यात सर्वाधिक १३ जागा मिळवल्या. देशात काँग्रेसनं ९९ जागा जिंकल्या. काँग्रेसची वाढती ताकद इंडिया ब्लॉकमधील अनेक पक्षांसाठी अडचणीची आहे. काँग्रेस मजबूत झाल्याचा फटका त्यांच्या मित्रपक्षांना बसू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला फटका बसावा अशी इंडिया ब्लॉकमधील अनेक पक्षांची इच्छा आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीला चांगलं यश मिळालं. त्यामुळे विरोधी पक्षांचं नेतृत्त्व काँग्रेस, पर्यायानं राहुल गांधी करु शकतात, अशी चर्चा सुरु झाली. हरियाणात सगळे एक्झिट पोल काँग्रेसच्या बाजूनं होते. त्यामुळे काँग्रेसचा वरचष्मा, वर्चस्व वाढू लागलं. पण हरियाणतील पराभवानंतर काँग्रेसला जोरदार धक्का बसला. मविआतील जागावाटपातही काँग्रेस पक्ष बॅकफूटला आला. आता राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस आणखी मागे यावा, अशी प्रादेशिक पक्षांची इच्छा आहे. काँग्रेसला महाराष्ट्रात फटका बसल्यास या पक्षांची इच्छा पूर्ण होईल.