Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Parivartan Mahashakti: एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीचेच सरकार असे अंदाज बांधण्यात येत असले तरी कोणत्याच आघाडीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. यासाठी प्रमुख पक्षांना अन्य पक्षांची मदत लागणार आहे. यामध्येच परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीचीही भूमिका महत्वाची असणार आहे.

दरम्यान राज्यातील तिसऱ्या आघाडीची सत्तास्थापनेबद्दल काय भूमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत आता आमदार बच्चू कडूंनी भूमिका स्पष्ट केली आहे. बच्चू कडू म्हणाले, आम्हाला महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडून संपर्क सुरू आहे. अद्याप आम्ही निर्णय घेतलेला नाही. एकदा कल हातात आला की आम्ही निर्णय घेऊ.
बच्चू कडू पुढे म्हणाले, महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडून आम्हाला संपर्क करणे सुरू आहे. पण एकदा कल हातात आल्यानंतर मगच आम्ही निर्णय घेऊ, फोन दोन्हीकडून आलेले आहेत. पण आम्ही वेगळ्या सरकारचे स्वप्न पाहात आहोत.
तर बच्चू कडूंनी निवडणुकीतील संभाव्य विजयावर देखील भाष्य केले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते जसे आम्हाला संपर्क करत आहेत, तसेच आम्ही देखील संपर्क करत आहोत. माझ्या पक्षाचे ४ ते ५ उमेदवार निवडून येतील, असा विश्वास आहे. तिसऱ्या आघाडीला घेऊन आम्ही सरकार बनवणार आहोत. कोणाला पाठिंबा देण्याऐवजी आपल्या सरकारचे स्वप्न पाहणे महत्वाचे आहे असे मला वाटते, पाठिंब्याची वेळ येणारच नाही, असेही बच्चू कडू यांनी म्हटले.