महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्रिपदाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यात रस्सीखेच सुरू असून फडणवीस दिल्लीहून मुंबईत परतले आहेत. यावेळी दिल्लीमध्ये त्यांची भेट कोणत्याही मोठया नेत्यांसोबत झाली नाहीये. आता लवकरच मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय होऊ शकतो, असे सांगितले जातंय.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अजूनही सस्पेंस कायम आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत अनेक बैठका देखील झाल्या. मुख्यमंत्रीपदाबाबत रस्साखेच सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस हे काल दिल्लीला एका खासगी कार्यक्रमानिमित्त गेले होते. मात्र, यावेळी त्यांची कोणत्याही बड्या भाजपा नेत्यासोबत बैठक झाली नाही. कोणालाही न भेटता ते परत मुंबईला आले. देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दाैऱ्याकडे सर्वांच्या नजरा होत्या.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, त्यांनी यावर भाष्य करणे टाळल्याचे बघायला मिळाले. एकनाथ शिंदे हेच परत एकदा मुख्यमंत्री व्हावेत, ही शिंदे गटाची इच्छा आहे. मात्र, संख्याबल लक्षात घेता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ शकतात. भाजपही फडणवीस यांच्यासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. महायुती सरकारला लाडकी बहिण योजनेचा फायदा झाल्याचे बोलले जातंय. शिंदे यांनी निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींचे धन्यवाद देखील मानले होते.