अस्तित्त्व संकटात, ठाकरे मविआतून बाहेर पडणार? शेवटचा बालेकिल्ला राखण्यासाठी समोर ३ पर्याय

Mumbai Politics: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला. मविआमध्ये सर्वाधिक जागा शिवसेना उबाठाला मिळाल्या. ठाकरेसेनेनं २० जागा जिंकल्या.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला. मविआमध्ये सर्वाधिक जागा शिवसेना उबाठाला मिळाल्या. ठाकरेसेनेनं २० जागा जिंकल्या. विधानसभेत पानीपत झाल्यानंतर आता पक्षातील अनेक नेते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा सूर आळवू लागले आहेत. पक्षानं स्वबळावर लढावं, असा नेत्यांचा सूर आहे. अनेकांनी त्यांची इच्छा उद्धव ठाकरेंकडे बोलून दाखवली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत एकला चलो रेची भूमिका घ्यावी, असं बहुतांश नेत्यांना वाटतं. मुंबई महापालिका हातातून गेल्यास शिवसेना उबाठाची अवस्था आणखी बिकट होऊ शकते. या परिस्थितीत ठाकरेंसमोर तीन पर्याय आहेत.

फेब्रुवारी २०२५ मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक होऊ शकते. विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाणाऱ्या शिवसेना उबाठाला आता महाविकास आघाडीत राहायचं की नाही, याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा लागेल. त्यांचा निर्णय दुधारी तलावारीसारखा असू शकतो. शिवसेना उबाठा स्वबळावर लढल्यास विरोधी मतांचं विभाजन होऊ शकतं. त्याचा थेट फायदा भाजप, शिवसेनेला होण्याची दाट शक्यता आहे. ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादी शपसोबत राहण्याचा निर्णय कायम ठेवल्यास परंपरांगत मतदार त्यांच्यापासून दूर जाऊ शकतो. विधानसभा निवडणुकीत याचा ट्रेलर दिसलेला आहे. महापालिका हातून निसटल्यास उरलेसुरलेले शिवसैनिक आणि नेते शिंदेंकडे किंवा भाजपकडे जाऊ शकतात.

मुंबई महापालिकेची शेवटची निवडणूक २०१७ मध्ये झाली. त्यावेळी शिवसेना, भाजप स्वबळावर लढले. शिवसेनेनं ८४, तर भाजपनं ८२ जागा जिंकल्या. त्यावेळी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांनी विखारी टीका केली होती. २०१२ मध्ये केवळ ३१ जागा जिंकणाऱ्या भाजपनं २०१७ मध्ये थेट ८२ जागा खिशात घातल्या. महापालिकेत एकूण २२७ प्रभाग आहेत. सत्ता स्थापनेसाठी ११४ जादुई आकडा आहे. मुंबई महापालिकेवर १९९७ पासून सेना, भाजपची सत्ता आहे. २०१९ मध्ये युती तुटल्यानंतर पालिकेतील समीकरणं बदलली.

विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेमुळे शिवसेना उबाठाची मोठी नाचक्की टळली. मुंबईत उबाठानं १० जागा जिंकल्या. तर भाजपनं १५, शिवसेनेनं ६ जागांवर बाजी मारली. उबाठानं मुंबईत जिंकलेल्या १० जागांपैकी निम्म्या जागांवर मनसेची भूमिका निर्णायक ठरली. मनसेच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे उबाठाचे उमेदवार जिंकले. याचा फटका शिवसेनेच्या उमेदवारांना बसला.

विधानसभा निवडणुकीत राज यांच्या मनसेचीही धूळधाण उडाली. राज यांच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही. मनसेला केवळ १.५५ टक्के मतदान झालं. तर शिवसेना उबाठाला ९.९६ टक्के मतं पडली. २०१२ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेनं २८ जागा जिंकल्या होत्या. पण २०१७ मध्ये हाच आकडा थेट ७ वर आला.

मुंबई महापालिका आशियातील सगळ्यात श्रीमंत महापालिका आहे. पालिकेचा अर्थसंकल्प अनेक राज्यांच्या अर्थसंकल्पांपेक्षा मोठा आहे. त्यामुळे शिवसेना उबाठाला महापालिकेवरील सत्ता टिकवावी लागेल. यासाठी आता पक्षाकडे ३ पर्याय आहेत. आघाडीत राहून अधिकाधिक जागा लढवून विजय मिळवायचा पहिला पर्याय पक्षासमोर आहे. दुसरा पर्याय स्वबळावर लढण्याचा आहे. यात पराजयाचा धोका अधिक आहे. तिसरा पर्याय मनसे आणि अन्य पक्षांना सोबत लढण्याचा आहे. त्यासाठी उद्धवसेनेला मनसेशी युती करावी लागेल. सध्याच्या घडीला दोन्ही ठाकरे संकटात आहे. त्यांचं राजकारण धोक्यात आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार का याकडे लक्ष लागलं आहे.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

bmc electionMumbai Municipal Corporationmumbai politicsshiv senaउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेभाजपमुंबई महापालिका निवडणूकशिवसेनाशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
Comments (0)
Add Comment