Eknath Shinde sets conditions for DCM post: एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असून त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी मावळल्याचे दिसते. परंतु समोर येत असलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदेंनी मात्र शिवसेनेच्या उपमुख्यमंत्रीपदासाठी भाजप पक्षश्रेष्ठींसमोर एक अट घातली असल्याचे समजत आहे.
दरम्यान महायुती सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम ठरला आहे. ५ डिसेंबरला आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी महायुतीच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे. पण एकनाथ शिंदे अचानकपणे दरे गावी पोहोचले आहेत. शिंदे दोन दिवस तेथे मुक्कामी राहणार असून दोन दिवस महायुतीच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. तरीही मंत्रिपदाच्या वाटाघाटीमुळे राजकीय वातावरण मात्र गरम असणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे राज्यकारभारातील सर्वात महत्वाच्या खातं असलेल्या गृहखात्यावर अडून बसले आहेत. तर नगरविकास खात्यासह अन्य १२ खात्यांवर त्यांनी आपला दावा मजबूत केला आहे. पण मागच्या सरकारमध्ये भाजपकडे गृहखातं राहिलं असल्याने त्यांचा देखील यावर प्रबळ दावा आहे.
महायुतीची पुढील बैठक मुंबईत होणार असल्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले आहे. दरम्यान अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली, असेही एकनाथ शिंदेंनी नमूद केले होते. आता राज्याचा कारभारी कोण आणि सोबतच राज्य मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.