Caretaker CM Eknath Shinde at Daregaon: राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या साताऱ्यातील मूळगावी दरे येथे मुक्कामी आहेत. सत्तास्थापनेच्या लगबगीतच ते गावी आल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र, आता गावी आल्यानंतर शिंदेंची तब्येत बिघडल्याचे समोर येत आहे.

प्रकृतीच्या कारणास्तव शिंदे आज घराबाहेर पडलेले नाहीत. त्यांनी घरीच आराम करणे पसंत केले. राजकीय वातावरण तापले असताना शिंदेंच्या शरीराचेही आता तापमान वाढले आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. आता मुख्यमंत्रीपदाचा मान कोणाला मिळणार? यावरून महायुतीमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. मुख्यमंत्रिपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडणार जवळपास निश्चित झाले आहे. पण आता शपथविधी सोहळ्याची वेळ जवळ येते असतानाच एकनाथ शिंदेंनी थेट मूळ गाव गाठल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
एकनाथ शिंदे गावी गेल्याने शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी मोठे विधान केले होते. काही मोठा निर्णय घ्यायचा असेल तरच ते आपल्या मूळगावी जातात असे शिरसाट म्हणाले. तर शनिवारी सायंकाळी मोठा निर्णय घेतील असेही शिरसाटांनी नमूद केले होते. यातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदेंच्या गावी जाण्यावरुन टोला लगावला. ते म्हणाले, त्यांच्या गावात अशी कोणती देवी आहे? ज्यासाठी शिंदेंना तिथे जावं लागलं.
दीपक केसरकर माघारी परतले
शिंदे गटाचे नेते माजी मंत्री दीपक केसरकर हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या दरे या गावी आले होते. मात्र, एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्याने केसरकर यांना महाबळेश्वरवरूनच माघारी परतावे लागले. दरम्यान, दीपक केसरकर मुंबईला रवाना झाले आहेत. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी अपेक्षा दरे गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.