Maharashtra Government Formulation: मुख्यमंत्री पद कोणाला यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला असून आता राज्य मंत्रिमंडळातील खाते वाटपावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यमंत्रिमंडळात कोणाकोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजप हा यंदाही मोठा पक्ष ठरल्याने शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपसोबत वाटाघाटी कराव्या लागणार आहेत. भाजप हा प्रामुख्याने सत्तेतील आपले वर्चस्व राखण्यासाठी तशी रणनीती आखताना दिसत आहे. जेणेकरुन युतीतील प्रत्येक पक्षावर नियंत्रण ठेवता येऊ शकेल. पण अद्याप मंत्रिमंडळाचे खातेवाटप अधिकृतपणे जाहीर झालेले नाही.
महाराष्ट्रात सत्तास्थापनेचे गणित कसे असणार आणि यासंदर्भात असणारे पेच सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आशा वाढल्या आहेत, पण अद्याप यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अंतिम निर्णय येणे बाकी आहे.
एकनाथ शिंदे यांनी बुधवारी भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत दिले होते. भाजप मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेणार त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत असणार असल्याचे भाष्य त्यांनी केले. तर पंतप्रधान मोदींवर माझा विश्वास असून मी त्यांच्या निर्णयात माझा अडथळा राहणार नाही, असेही एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते. परंतु गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर समोर आलेल्या फोटोवरुन शिंदे काहीसे उदासीन असल्याचे दिसत आहे. यातच त्यांनी शुक्रवारी अचानक आपल्या मुळगाव दरे गाठले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.