Solapur News : मारकडवाडी गावातील ग्रामस्थांचं मी अभिनंदन आणि कौतुक करतो, मी देखील मारकडवाडी पॅटर्न राबवणार असल्याचं वक्तव्य माजी मंत्र्यांनी केलं आहे. चंद्रावर गेलेल्या यानाला जमिनीवरुन रिमोटद्वारे नियंत्रित केलं जातं, तर ईव्हीएम मशीन काय चीज आहे, असं म्हणत त्यांनी EVM हटवण्याचं म्हटलं आहे.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात मारकडवाडी पॅटर्न राबवणार
काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांचा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ४९ हजार ५७२ मतांनी पराभव झाला आहे. भाजपचे सचिन कल्याणशेट्टी हे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झाले. काँग्रेसचे उमेदवार सिद्धराम म्हेत्रे यांना ९८ हजार ५३३ मतं मिळाली आहेत. भाजपचे सचिन कल्याणशेट्टी यांना १ लाख ४८ हजार १०५ मतं मिळाली आहेत.
सिद्धराम म्हेत्रे यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे, की मला देखील ईव्हीएम मशीनवर संशय आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील एका गावातील एका बुथवर काँग्रेसला फक्त एक मतदान आहे. हे शक्य नाही. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील विविध गावात मारकडवाडी पॅटर्न राबवण्यात येणार असल्याची माहिती सिद्धराम म्हेत्रे यांनी दिली आहे.
राज्यात उद्रेक होईल; माजी आमदाराने दिला इशारा, मतदारसंघात मारकडवाडी पॅटर्न राबवण्याची घोषणा
चंद्रावरील यानाला जमिनीवर बसून नियंत्रित केलं जातं, मग त्यासमोर ईव्हीएम काय?
काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी चंद्रावरील यानाचं उदाहरण दिलं. चंद्रावर गेलेल्या यानाला जमिनीवर बसून रिमोटद्वारे नियंत्रित केलं जातं, तर ईव्हीएमला हॅक करता येऊ शकत नाही का? हे सर्व गौडबंगाल आहे. ईव्हीएम हटवले पाहिजे, अन्यथा देशात बांग्लादेश किंवा श्रीलंका सारखी परिस्थिती निर्माण होईल. जनतेच्या उद्रेकाला सामोरं जावं, लागेल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी दिली आहे.