कोकणातून दीपक केसरकर, उदय सामंत, भरत गोगावले, आदिती तटकरे, नितेश राणे, योगेश कदम ही महायुतीतील नावं मंत्रिमंडळासाठी चर्चेत आहेत.
शिवसेनेकडून मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. मात्र कोकणातून रत्नागिरी जिल्ह्यातून उदय सामंत व रायगडमधून शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार भरत गोगावले, अजित दादांच्या राष्ट्रवादीकडून खासदार सुनील तटकरे यांच्या सुकन्या आदिती तटकरे ही तीन नावं निश्चित मानली जातात. मात्र या मंत्रिमंडळात तळ कोकणातील सावंतवाडी मतदारसंघाचे दीपक केसरकर यांना पुन्हा संधी मिळणार किंवा कसे हे पहावे लागणार आहे. आमदार भरत गोगावले यांची संधी महायुतीच्या पहिल्या अडीच वर्षाच्या टर्ममध्ये हुकली होती त्यामुळे नाराज असलेल्या गोगावले यांना संधी देण्यासाठी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना प्राधान्याने विचार करावा लागणार आहे.
कदम यांना एकनाथ शिंदे यांचा शब्द
मंत्रिमंडळात युवा वर्गाला स्थान देण्यासाठीही महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना विचार करवा लागणार आहे. यामध्ये अदिती तटकरे व उदय सामंत ही दोन नावं निश्चित झाली आहेत. याचवेळी आणखी एका नव्या युवा नेत्याला संधी मिळू शकते. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे सुपुत्र दापोलीचे आमदार योगेश कदम हे कोकणातील सगळ्यात युवा आमदार म्हणून ओळखले जातात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दापोलीतील जाहीर सभेत ‘तुम्ही योगेशला आमदार करा मी नामदार करतो’ असा शब्द जाहीर सभेत दिला होता. आता या शब्दाची वचनपूर्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज करतात का याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.
Maharashtra Ministers : तटकरे, राणे, कदम; कोकणातील जनरेशन नेक्स्टचे मंत्रिमंडळात ‘कदम’, जुने-जाणते साफ एकदम?
भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र कणकवलीचे आमदार नितेश राणे यांना मंत्रिमंडळात भाजपकडून स्थान दिले जाऊ शकते. त्यांची ही तिसरी टर्म आहे व हिंदुत्ववादी नेता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. नितेश राणे यांनी राज्यभर सभा गाजवल्या आहेत. मुंबईतही त्यांनी अनेक सभा घेतल्या आहेत. त्यामुळे नितेश राणे यांच्यासारख्या युवा नेत्याला महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान हे निश्चित मानले जाते. मात्र या सगळ्या राजकीय घडामोडीत शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळणार का, की त्यांना पक्ष संघटनेची जबाबदारी देऊन मंत्रिमंडळातून नारळ देणार अशीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे कोकणातून कोणाकोणाला संधी मिळते याकडे अवघ्या कोकणाचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागले आहे.