Upcoming marathi movie 2025: मराठी चित्रपटविश्वासाठी मागचं वर्ष संमिश्र गेलं. वैविध्यपूर्ण विषय, तंत्रज्ञानाचा वापर, कलाकार, सादरीकरण अशा सर्वच बाबींमुळे सिनेमे लक्षवेधी ठरले. आता नव्या वर्षात सिनेमांचं नवं पर्व दिसणार आहे. प्रतिष्ठित दिग्दर्शकांचे सिनेमे, महत्त्वाकांक्षी कलाकृती यामुळे हे वर्षही मराठी सिनेसृष्टीसाठी खास ठरेल अशी आशा व्यक्त केली जातेय.
‘मु. पो. बोंबिलवाडी’, ‘संगीत मानापमान’, ‘जिलबी’, ‘फसक्लास दाभाडे’, ‘गोल गोल राणी’, ‘प्रेमाची गोष्ट २’ या सिनेमांत मराठीतले आघाडीचे कलाकार एकत्र झळकणार आहेत. प्रस्थापित कलाकारांना एकत्र सिनेमात आणण्यासाठी निमति आग्रही आहेत. त्यात सिक्वेल सिनेमेही आहेत. यामध्ये अंकुश चौधरी दिग्दर्शित ‘पुन्हा साडे माडे तीन’, संजय जाधव दिग्दर्शित ‘येरे येरे पैसा ३’ आणि ‘पुन्हा दुनियादारी’ या सिनेमांचा समावेश आहे. दिग्दर्शक मंडळीही मराठी सिनेमांचे विषय, मांडणी, सादरीकरण यावर विचार करत नवं काही देण्याच्या प्रयत्नात आहेत. म्हणूनच आगामी काळात अनेक महत्त्वाकांक्षी कलाकृती प्रदर्शित होणार आहेत.
इतिहास आणि साहित्याची पानं ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमानंतर सुबोध भावे ‘संगीत मानापमान’ च्या निमित्तानं पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. अभिनेता रितेश देशमुख ‘राजा शिवाजी’ हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात तो स्वतः महाराजांची भूमिका साकारत आहे. तसंच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा सिनेमाही पोस्ट प्रोडक्शनच्या शेवटच्या टप्प्यात आहे. यात अभिनेता अक्षयकुमार यानं छत्रपती शिवाजी महाराज ही व्यक्तिरेखा साकारली आहे.
वास्तववादी धाटणीच्या चित्रपटांमधून वेगळेपण दाखवून देणारा दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या ‘फकिरा’ या कादंबरीवर सिनेमा करतोय. तर ‘शिवअष्टक’ सिनेमांसह दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर लवकरच ‘मुक्ताई’ हा चित्रपट नववर्षांत प्रदर्शित होणार आहे. नागराज मंजुळे याचं दिग्दर्शन असलेल्या ‘खाशाबा’ या सिनेमाकडेसुद्धा प्रेक्षकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू खाशाबा जाधव यांच्या संघर्षमय जीवनावर हा सिनेमा आधारित आहे.
२०२५मध्ये हे मराठी सिनेमे येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नागराज मंजुळेंच्या ‘त्या’ सिनेमाची उत्सुकता
याकडेही लक्ष
! ‘गोदावरी’ नंतर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक निखिल महाजन ‘रावसाहेब’ या सिनेमावर काम करतोय. या सिनेमात मुक्ता बर्वे, मृण्मयी देशपांडे, सोनाली कुलकर्णी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसंच प्रसाद ओकचा ‘वडापाव’, केदार शिंदेचा ‘झापुक झुपूक’, तेजस देऊस्करचा ‘देवमाणूस’ अशा वैविवध्यपूर्ण विषय असलेल्या सिनेमांमुळे प्रेक्षकांनाही नवा अनुभव मिळेल अशी खात्री व्यक्त केली जातेय.