Chhaava Box Office Collection On Day 5: ‘छावा’ चित्रपट रीलिज होऊन अवघे ५ दिवस झाले आहेत आणि या चित्रपटाने १६० कोटींचा टप्पा सहज पार केला आहे.
हायलाइट्स:
- ‘छावा’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
- पाच दिवसात १६० कोटींहून जास्त कमाई
- पाचव्या दिवशी कोट्यवधींचा गल्ला
किती झाली आहे कमाई?
रीलिजच्या पहिल्या दिवशी, १४ फेब्रुवारी रोजी ‘छावा’ या सिनेमाने भारतात ३३.१ कोटी रुपयांची कमाई केली. तर १५ फेब्रुवारी रोजी पहिल्या शनिवारी ही कमाई ३९.४० कोटी रुपयांवर पोहोचली होती. त्यानंतर या चित्रपटाने पहिल्या रविवारी (१६ फेब्रुवारी) ४९.०३ कोटी रुपयांची जबरदस्त कमाई केली. हा सिनेमा सोमवारच्या परीक्षेतही उत्तीर्ण झाला आणि चौथ्या दिवशी २४.१० कोटी रुपये कमावण्यात चित्रपटाला यश मिळाले. Sacnilk ने दिलेल्या वृत्तानुसार पाचव्या दिवसाच्या कमाईची सुरुवातीची आकडेवारी १९.८६ कोटी आहे. त्यामुळे एकूण ५ दिवसांची कमाई १६५ कोटींहून अधिक झाली आहे.
रीलिजनंतरच्या पाचव्या दिवसात थिएटरमध्ये प्रदर्शित होणारे असंख्य शो अद्याप शिल्लक आहेत, त्यामुळे या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पाच दिवसातच या चित्रपटाने १६० कोटींचा टप्पा ओलांडल्याने २०० किंवा ३०० कोटींचा गल्ला या चित्रपटाने कमावल्याचे लवकरच पाहायला मिळेल.
दरम्यान लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि मॅडॉक फिल्म्स निर्मित या चित्रपटात विकीसह रश्मिका मंदान्ना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, संतोष जुवेकर, डायना पेंटी, विनीत कुमार सिंग या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय मराठी कलाकारांची एक मोठी फौज यामध्ये आहे. शुभंकर एकबोटे, आशिष पाथोडे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, नीलकांती पाटेकर हे मराठी कलाकार या चित्रपटात आहेत. सोशल मीडियावर सध्या या सर्वच कलाकारांचे भरभरुन कौतुक केले जाते आहे.