‘जागर मुंबईचा हे जनतेच्या मनातील आंदोलन आहे. मुंबईची अवस्था नरकासारखी झाली आहे. रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. मुंबई महापालिका शाळांची परिस्थिती भयानक आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. गेल्या २५ वर्षांपासून सत्तेत असून शिवसेनेने मुंबईसाठी काय केले? त्यांनी केवळ भावनिक राजकारण केले. मुंबईला संपवण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. या विरोधात संपूर्ण ताकदीने लढावे लागेल’, असे लोढा म्हणाले. ठाकरे परिवाराला केवळ आपल्या संपत्तीचे काय होणार याची काळजी आहे. मालवणीतील हिंदूंच्या संरक्षणासाठी आम्ही उभे आहोत. ज्यांनी आमची मंदिरे तोडली, जबरदस्तीने धर्म परिवर्तन केले त्या अफजल खानाच्या कबरीवरील अतिक्रमण दूर केले, असेही लोढा यांनी सांगितले.
शुक्रवारी महिला आयोगाची एक बैठक झाली, त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ‘लग्नानंतर ज्या मुलींचा आपल्या मूळ कुटुंबीयांशी संपर्क तुटला आहे. त्यांची सध्या काय परिस्थिती आहे? तसेच आपल्या कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन त्या एका व्यक्तीसोबत निघून गेल्या आहेत. ज्यामुळे आपल्या कुटुंबीयांकडे त्या तक्रारही करू शकत नाहीत. ज्या व्यक्तीसोबत त्या निघून गेल्या आहेत, त्या व्यक्तीला माहित आहे की, या मुलींना त्यांच्या कुटुंबीयांचे समर्थन नाही. त्यामुळे त्यांचे काय होते हे आपण श्रद्धा वालकर प्रकरणातून पाहिले आहे. अशा मुलींना मदत करता यावी म्हणून मी एक विशेष पथक नेमण्याचे निर्देश दिले आहेत’, असे लोढा यांनी सांगितले.
लव्ह जिहादमुळे तरुणी बेपत्ता होत असल्याची काही आकडेवारी, माहिती महिला आयोगाच्या बैठकीत तुमच्यासमोर मांडण्यात आली का, असा प्रश्न लोढा यांना विचारण्यात आला. त्यावर, ‘आकडेवारी नाही, मात्र अशी १० ते १२ प्रकरणे माझ्यासमोर आहेत. त्यातही असे काही झालेले असू शकते’, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.