प्रेम, विश्वास आणि सामाजिक सौहार्दचा संदेश देणाऱ्या भारत जोडो यात्रेने ५ राज्यांतून सुमारे १,७०० किमी यात्रेचा प्रवास पूर्ण केला. गेली १४ दिवस भारत जोडो यात्रेचं आणि राहुल गांधींचं लोकांनी स्वागत केलं, त्यांना भरभरुन प्रेम दिलं. काल जळगाव जिल्ह्यातील जामोद तालुक्यातील निमखेडी गावात राहुल गांधी यांनी शेवटची कॉर्नर सभा घेतली. यावेळी त्यांनी अतिशय भावनिक भाषण करत उपस्थितांच्या काळजाला हात घातला. सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस राहुल गांधी गुजरातच्या दौऱ्यावर असल्याने भारत जोडो यात्रा मध्यप्रदेशच्या सीमेवरच थांबणार आहे.
राहुल गांधी म्हणाले, “गेली १४ दिवस महाराष्ट्राच्या जनतेने मला खूप प्रेम दिलं, आशीर्वाद दिला, विश्वास दिला. मी खरोखर भरुन पावलोय… महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राला समाजसुधारकांचा देखील मोठा वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं साहस, बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, महात्मा फुलेंचं शिक्षण या गोष्टी स्मृतीत ठेऊन आणि महाराष्ट्रवासियांचं प्रेम घेऊन मी पुढचा प्रवास करतोय. काँग्रेस पक्षाच्या विचारधारेची समज, तरुणांची स्वप्न, माता-भगिनींचं दुःख हे सगळं तुम्ही मला सांगितलंत, दाखवलंत.. हे मी कधीच विसरणार नाही”
“प्रेम, विश्वास आणि सामाजिक सौहार्द टिकावा हा भारत जोडो यात्रेचा मु्ख्य उद्देश आहे. पण ज्यांनी द्वेष पसरवला ते पण आपलेच आहेत की.. या भारत जोडो यात्रेतून परिवर्तन नक्की होईल. देशाच्या विकासासाठी मी सतत संघर्ष करीत राहील”, अशा शब्दात महाराष्ट्राला आश्वस्त करुन आणि महाराष्ट्रवासियांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल राहुल गांधी यांनी आभार मानले आणि बुलंद ‘जय महाराष्ट्र’ची घोषणा देऊन त्यांनी आपल्या वाणीला पूर्णविराम देत महाराष्ट्राचा निरोप घेतला.