भाजपच्या मर्जीशिवाय एक शब्दही बोलू शकत नाहीत; उद्धव ठाकरेंनी उडवली मुख्यमंत्र्यांची खिल्ली

Maharashtra Politics | महाराष्ट्र छत्रपती शिवरायांना मानतो. मात्र त्यांचा अपमान झाल्यावर भाजपच्या लोकांकडून गुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. केंद्रात ज्यांचं सरकार असतं त्यांच्या विचारांची माणसं राज्यपाल म्हणून नेमली जातात. या माणसांची कुवत काय असते, या माणसांची पात्रता काय असते? ज्या माणसांना वृद्धाश्रमातही जागा मिळत नाही, त्यांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

 

उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

हायलाइट्स:

  • महाराष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला करण्याचा हा भाजपचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे का?
  • सर्व महाराष्ट्रप्रेमींनी एकत्र येऊन याला विरोध केला पाहिजे
मुंबई: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील ४० गावांवर दावा सांगितल्याच्या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या राजकीय वादात आता शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी उडी घेतली आहे. या मुद्द्याला हात घालताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चांगलीच खिल्ली उडविली.

कर्नाटकचे मुख्यंत्री महाराष्ट्रातील गावांवर दावा सांगतात. महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि दैवतांचा अपमान होत आहे. पण मुख्यमंत्र्यांना त्याची कोणतीही खंत किंवा चिंता नाही. काहीतरी गोलमाल उत्तर देऊन ते वेळ मारून नेतात. या राज्याला मुख्यमंत्री आहे का तेच कळत नाही. ते कधीही बोलतच नाहीत. महाराष्ट्रातील ४० गावं कर्नाटकमध्ये जात असतीत तर मुख्यमंत्री नेहमीच्या शैलीत उत्तर देतील. ते म्हणतील, काळजी करु नका. मी पंतप्रधानांना फोन केला होता. त्यांनी सांगितलं आहे की, कर्नाटकने महाराष्ट्रातील ४० गावं घेतली तर घेऊ दे. आपण पाकव्याप्त काश्मीर जिंकल्यावर १०० गावं महाराष्ट्राला देऊ, असं कदाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतील. त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षाच नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील सारवासारव करत आहेत. सांगण्याचा मुद्दा हा आहे की, भाजपच्या अखत्यारितील राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या वरिष्ठांच्या मर्जीशिवाय काही बोलू शकतात का? मग तसं नसेल तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे त्यांच्या वरिष्ठांच्या परवानगीशिवाय बोलले आहेत का? महाराष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला करण्याचा हा भाजपचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे का? तसे असेल तर सर्व महाराष्ट्रप्रेमींनी एकत्र येऊन याला विरोध केला पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
राज्यपालांना हटवा अन्यथा पुढच्या ४ दिवसांत…; सरकारला इशारा देत उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

उद्धव ठाकरेंचा राज्यपालांवर हल्लाबोल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. ही शक्कल एकट्या राज्यपालांच्या काळ्या टोपीतून आलेली नाही. त्यांच्या सडक्या मेंदूच्या मागील मेंदू कोण आहे, हे शोधण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील आदर्शांचा हळुवारपणे अपमान केला जात आहे. मागे भगतसिंह कोश्यारी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलले होते. सातत्याने अपमान करून महाराष्ट्राच्या रक्तात भिनलेले आदर्श नष्ट करायचे. मग भाजपच्या काही भाकड नेत्याची नवे आदर्श म्हणून जनतेच्या मनात प्रतिमा बिंबवण्याची चाल खेळली जात आहे. त्याला विरोध झाला पाहिजे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांना पदमुक्त करण्याची मागणीही केली. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मागणीला केंद्र सरकारकडून नेमका कसा प्रतिसाद दिला जातो आणि खरंच राज्यपालांकडून पदभार काढून घेतला जातो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

Bhagat Singh KoshyaribjpDevendra FadnavisEknath ShindeMaharashtra politicsUddhav Thackerayउद्धव ठाकरेएकनाथ शिंदे
Comments (0)
Add Comment