शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष जी पावलं उचलायची आहेत ती उचलतोच आहोत. संभाजीराजे, उदयनराजेंनी घेतलेली भूमिका म्हणजे लोकभावना आहे. राज्यपालांचे जिथे जिथे कार्यक्रम ते उधळून लावू, ही राज्याच्या मनातली भावना आहे. महाराष्ट्राने अजूनही संयम राखला आहे आणि इकडे भाजपवाले त्यांचं लंगडं समर्थन करतायेत. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याकडून शिवरायांचा अवमान झाला होता तेव्हा त्यांनी जाहीर माफी मागितली होती, एवढे ते मोठे होते. त्यांना ज्यावेळी कळलं की आपल्याकडून चूक झाली तेव्हा पंतप्रधानपदी असताना त्यांनी माफी मागितली, दिलगीरी व्यक्त केली होती. तसेच मोरारजी देसाई, त्याकाळचे मोठे नेते होते. महाराष्ट्राचा त्यांच्याशी भलेही वाद आहे पण त्यांच्याकडूनही छत्रपतींविषयी चुकीची विधाने गेल्यानंतर त्यांनीही माफी मागितली होती. पण सध्याच्या राज्यपालांनी अजूनही माफी मागितलेली नाहीये, याकडे राऊतांनी लक्ष वेधलं.
महाराष्ट्राच्या मनात संतापाची भावना आहे, याचा उद्वेग होणारच…!
भाजपच्या आराध्य दैवतांकडून छत्रपती शिवरायांचा अपमान होतोय आणि त्यांचे नेते शहाणपण शिकवतात. महाराष्ट्र हे सगळं बघतोय, महाराष्ट्राच्या मनात संतापाची भावना आहे, याचा उद्वेग झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देतानाच राज्यपालांविरोधात महाविकास आघाडी उदयनराजे-संभाजीराजेंसोबत असल्याचं सूतोवाच राऊतांनी केलं.
राजकारण ही मिमिक्री नाही
राजकारण करणं म्हणजे मिमिक्री करणं नव्हे. आम्हाला जर ओरिजिनल मिमिक्री पाहायची असेल तर आम्ही जॉनी लिव्हरची पाहू. आम्हाला जर मुद्राभिनय, नाट्याभिनय पाहायचा असेल तर आम्ही जॉनी लिव्हरला पाहू ना…आम्हाला राजू श्रीवास्तव आवडायचा… आवाज काढणं वगैरे आता खूप झालं… याच्यापलीकडे जा.. आता आपण मॅच्युअर झालेला आहात. महाराष्ट्र पाहा… राजकारणात काही विधायक काम करा, संघटनात्मक काम करा, असं प्रत्युत्तर देतानाच उद्धव ठाकरेंवर टीका करुन वा दुसऱ्या पक्षावर किंवा नेत्यावर बोलून तुमचं राजकारण किती काळ चालणार, असा सवालही राऊतांनी राज ठाकरेंना विचारला.
टीका कसली करता, उद्धव ठाकरेंचं बुलढाण्यातील भाषण ऐका!
“जे आमच्यावर टीका करतायेत, जे उद्धव ठाकरेंवर टीका करतायेत, त्यांनी आमची बुलडाण्याची सभा पाहायला हवी होती, त्यांनी उद्धव ठाकरेंचं बुलडाण्याचं भाषण ऐकायला हवं होतं.. अख्ख्या बुलडाण्याचा प्रतिसाद त्यांनी पाहायला हवा होता… बुलडाण्याच्या लोकांनी उद्धव ठाकरेंचं केलेलं अभूतपूर्व स्वागत उभ्या महाराष्ट्राने पाहिलं”
राहुल गांधींएवढे चार दिवस कष्ट घेऊन दाखवा
राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेसाठी जेवढे कष्ट आणि मेहनत घेतली तेवढे कष्ट त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी चार दिवस घेऊन, असा टोला त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला.