‘जी-२० उत्सवा’साठी ‘डिजिटल भारत’ सज्ज; महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः जी-२० गटाचे अध्यक्षपद यावर्षी भारताकडे आले आहे. यानिमित्ताने १ डिसेंबर २०२२ ते १ डिसेंबर २०२३ या वर्षभरात देशाच्या कानाकोपऱ्यात विविध विषयांवर चर्चासत्रे, परिषदा, परिसंवाद आयोजित केले जाणार आहेत. या सर्व कार्यक्रमांतून देशाने केलेली डिजिटल प्रगती मांडणार असल्याची माहिती नीती आयोगाचे माजी सीईओ आणि जी-२० कार्यक्रमांचे शेर्पा अमिताभ कांत यांनी सोमवारी मुंबईत दिली.

जी-२० अध्यक्षपद मिळाल्यानंतर लेहपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वच राज्यांत, केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यावेळी मुख्यतः डिजिटल प्रगतीचे दर्शन विविध देशांच्या प्रतिनिधींना घडवले जाणार आहे. नागरिकांना ओळख देण्यापासून ते करोना प्रतिबंधक लशींच्या आकडेवारीपर्यंतच्या डिजिटल प्रगतीचा आलेख यातून मांडला जाईल, असे कांत म्हणाले. यावेळी व्यासपीठावर जी-२०चे संयुक्त सचिव नागराज नायडू काकानूर आणि ईनम गंभीर तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम क्षेत्रीय महासंचालक मोनीदिपा मुखर्जी उपस्थित होते. मुंबईमध्ये आज, मंगळवार ते १६ तारखेपर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. ‘जागतिक वातावरण सध्या अस्थिर आहे’, असे सांगत अमिताभ कांत म्हणाले, ‘भारताने जी-२० अध्यक्षपदाच्या संपूर्ण वर्षासाठी वसुधैव कुटुंबकम् ही संकल्पना निश्चित केली आहे. जागतिक स्तरावर पुरवठा साखळी सध्या विस्कळित झाली आहे. ७० देश कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेले आहेत. त्यामुळे सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी वसुधैव कुटुंबकम् हे सूत्र अनुसरूनच पुढे जावे लागेल’, याकडे कांत यांनी लक्ष वेधले.

भारत : ग्लोबल हॉटस्पॉट

देशाने गेल्या सात वर्षांत केलेली प्रगती ही भारतासारख्या देशाच्या ५० वर्षांतील प्रगतीएवढी असल्याचे जागतिक स्तरावरील मत आहे, याकडे अमिताभ कांत यांनी लक्ष वेधले. ४० कोटी नवी बँक खाती, ५५ हजार किलोमीटर लांबीची महामार्ग उभारणी, दोन अब्ज लशींच्या मात्रांचे वितरण, आयुष्मान भारत अंतर्गत ५० कोटी नागरिकांची नोंदणी अशा भारताच्या काही उपलब्धींचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

जी-२० कार्यक्रमांतर्गत नियोजन

– कार्यक्रमांचे वर्गीकरण करताना स्टार्टअप हा प्रथमच वेगळा गट

– महिलांद्वारे केल्या गेलेल्या विकासावर भर

– २१व्या शतकासाठी बहुस्तरीय व्यवस्थांची निर्मिती

– आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांत स्थायी विकास

– विविध राज्यांत कार्यक्रम आयोजित करताना प्रत्येक राज्याच्या संस्कृती व परंपरांचे दर्शन

महाराष्ट्रातील उद्देश

– नागरिकांच्या जगण्याशी संबंधित गोष्टींची चर्चा केली जाईल

– डिजिटल प्रगतीचे प्रदर्शन केले जाईल

– जगाच्या दक्षिण गोलार्धाचा आवाज म्हणून भारताची प्रतिमा दाखवली जाईल

– महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवले जाईल

– महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ, पोशाख, वस्त्रे यांची ओळख यानिमित्ताने करून दिली जाईल

Source link

g 20 summit mumbaiG20 SummitG20 summit in 2023g20 summit mumbai venueMumbai G20 summit traffic restrictions
Comments (0)
Add Comment