सरकारचा एक निर्णय आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून चौफेर टीका; नेमकं काय घडलं?

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर राजकीय वातावरणही तापलं आहे. कर्नाटक सीमाप्रश्न आणि महापुरुषांच्या अवमानावरून विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला घेरलं. राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे वादळी ठरत असलेल्या या अधिवेशनावेळी सरकारने घेतलेल्या एका निर्णयाचीही चांगलीच चर्चा होत आहे. भाजप नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सरकारने विधीमंडळ परिसरात शाई पेनावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयासह भाजप नेत्यांकडून होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’तून घणाघाती टीका करण्यात आली आहे.

‘सरकार पक्षानेच महाराष्ट्रातील महापुरुषांची निंदानालस्ती करून महाराष्ट्राची बदनामी चालवल्याने मराठी अस्मिता दुखावली. मराठी मने पेटली व त्याची धग विराट महामोर्चाच्या रूपाने मुंबईच्या रस्त्यांवर १७ डिसेंबर रोजी दिसली. मात्र या संतापाचा लाव्हा सरकारने अजून ओळखलेला दिसत नाही. महाराष्ट्रातील सरकार मिंधे तर आहेच; पण आता ते धसका सरकारही बनले आहे. शाईहल्ल्याच्या भीतीने विधिमंडळ आवारात शाईच्या पेनवर बंदी घालण्याचा सरकारचा निर्णय भेदरटच म्हणावा लागेल. शाईवर बंदी घालण्यापेक्षा शाईफेक होणार नाही अशी आचरट विधाने मंत्री व सत्तापक्षाच्या नेत्यांनी टाळली तर असे बंदीचे घाबरट निर्णय घेण्याची वेळ धसका सरकारवर येणार नाही,’ असा टोला ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

कर्नाटकची मग्रुरी सुरूच; महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही

ठाकरेंच्या शिवसेनेनं सरकारला काय सल्ला दिला?

शाईफेकीच्या घटना आणि त्या टाळण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयावर टीकास्त्र सोडताना ‘सामना’तून सरकारला एक सल्लाही देण्यात आला आहे. ‘लोकशाही राज्यव्यवस्थेत सरकारने जनतेचा विश्वास संपादन करणे, जनतेला आपलेसे करणे आणि जनतेची मने जिंकणे अपेक्षित असते. पण महाराष्ट्रात तसे होताना दिसते आहे काय? सरकारचे वर्तन जनतेला सुखावणारे असायला हवे, तरच जनतेच्या मनातही राज्यकर्ते वा सरकारविषयी आपुलकी व ममत्वाची भावना वाढीस लागते. मात्र जनतेला सुखावणे तर दूरच, पण दुखावणारे वर्तन सरकार वा सत्तापक्षाच्या पुढाऱ्यांनी महाराष्ट्रात सुरू केले. आधी तोंडाला येईल ते बरळायचे, जनतेच्या मनातील श्रद्धास्थानांवर आघात करायचा, महापुरुषांची वाटेल तशी बदनामी करायची आणि नंतर धसका घेऊन शाईच्या पेनवर बंदी घालण्याचे भेदरट निर्णय घ्यायचे, यालाच राज्यकारभार म्हणावे काय? शाईवर किंवा पेनवर बंदी घालण्यापेक्षा शाईफेक होणारच नाही असा कारभार करायला काय हरकत आहे! बरे, विधिमंडळात शाईच्या पेनवर बंदी घातल्याने काय साध्य होणार आहे? सरकारला जनतेत मिसळावेच लागते. मंत्र्यांना, लोकप्रतिनिधींना जनतेत जाऊन संवाद करावाच लागतो. मग शाईच्या पेनवर अशी बंदी कुठे कुठे घालणार? त्यामुळे असे शाईबंदीचे उफराटे निर्णय घेण्यापेक्षा उफराटी विधाने करणाऱ्या पुढाऱ्यांच्या बेलगाम बोलण्यावर खरे तर बंदी घालायला हवी,’ असं ‘सामना’त म्हटलं आहे.

दरम्यान, आज हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून होणाऱ्या राजकीय हल्ल्यांना सत्ताधारी कसं प्रत्युत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Source link

assembly session newsmaharashtra karnataka border disputeSaamana editorialshivsena newsउद्धव ठाकरेमहाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नशिवसेना बातम्यासामना अग्रलेखहिवाळी अधिवेशन २०२२
Comments (0)
Add Comment