सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी येथील अशोक गीराम हे रात्री जेवण केल्यानंतर फिरण्यासाठी सेलू परभणी रस्त्यावर आले होते. रात्री ९च्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात त्यांना डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच बाळासाहेब काजळे यांनी अपघातस्थळी भेट देवून मृतदेह रुग्णवाहिकेच्या मदतीने शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. दरम्यान, मागील काही दिवसात सेलू-परभणी आणि सेलू-जिंतूर मार्गावर अपघाताच्या घटना वाढल्या असल्याचे दिसत आहे. परभणी सेलू रस्त्याची नव्याने दुरुस्ती करण्यात आल्याने खड्डयाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे यामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे.
वेगावर नियंत्रण राहत नसल्यामूळे अपघाताच्या घटना वाढत आहेत. तर सेलू-जिंतूर या मार्गाची अवस्था बिकट झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. शिवाय रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडूपे वाढली आहेत. त्यामुळे वळणावर समोरुन येणारे वाहन दिसत नाही. रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने रस्त्याच्या दुतर्फा असलेली काटेरी झुडूपे तोडून टाकावीत आणि खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होणार की नाही? फडणवीसांनी विधिमंडळातच स्पष्टपणे सांगून टाकलं