मी कसं काम करावं, हे मला चांगलं कळतं… शरद पवारांच्या फोनचा प्रश्न अन् अजित पवार संतापले!

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अपशब्द वापरल्याने त्यांचं अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आलं. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्रमक भूमिका न घेतल्याने, निलंबनावेळी सत्ताधाऱ्यांना धारेवर न धरल्याने त्यांचं निलंबन करणं शिंदे-फडणवीसांना सोपं गेल्याचा आरोप अजित पवार यांच्यावर झालं. तसेच अजित पवार यांच्या मवाळ भूमिकेवर शरद पवार यांनी त्यांची शाळा घेतल्याची चर्चा होती. हाच प्रश्न अजित पवार यांना पत्रकारांनी विचारला. यावेळी पत्रकाराच्या प्रश्नावर अजित पवार चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले.

गेली ३२ मी राजकारण-समाजकारणात वावरतो आहे. मला काय दुधखुळा समजला काय? विरोधी पक्षनेते म्हणून माझं काम मी कसं करावं, हे मला कुणी सांगण्याची गरज नाही. मला विरोधी पक्षनेतेपदावर बसवलेल्या आमदारांना माझं काम माहिती आहे, त्याचमुळे तर त्यांनी मला त्या पदावर बसवलं. बरं माझ्यावर पवारसाहेब नाराज झाले, हे तुम्हाला कुणी सांगितलं, पवारसाहेबांनी तुम्हाला फोन केला होता का? असे एकामागून एक सवाल करत कंड्या पिकवण्याचं काम करु नका, अशा शब्दात अजित पवार यांनी पत्रकाराला खडसावलं. मी तर त्यांच्या दररोज संपर्कात असतो. तुमच्या ज्ञानात ही भर कुणी टाकली? तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे म्हणून काहीही प्रश्न विचारु नका, लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करुन नका, असं अजित पवार म्हणाले. ते अमरावतीत बोलत होते.

शरद पवार यांनी अजितदादांना फोन का केला होता?

जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. राष्ट्रवादीच्या नेते पदाधिकाऱ्यांनीही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर दबावातून कारवाई केल्याचा आरोप केला. राष्ट्रवादीच्या गोटातून जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर संतापाचा सूर उमटला. सारा प्रकार लक्षात घेऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार यांना दूरध्वनीवरुन संपर्क केला. सभागृहात नेमकं काय घडलं, याची माहिती घेतली. जयंत पाटील यांना नेमकं काय म्हणायचं होतं? कोणत्या कारणावरुन त्यांचं निलंबन केलं गेलं? याची माहिती पवार यांनी अजितदादांकडून घेतली.

जयंत पाटील यांचं निलंबन

विधानसभेत दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून जोरदार गदारोळ सुरू होता. या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षाचेच आमदार आक्रमक झाले होते. तालिकाध्यक्ष संजय शिरसाट यांनी या दरम्यान विरोधी बाकांवरील सदस्यांना बोलण्याची संधी दिली नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील हे बोलण्यासाठी परवानगी मागत होते. मात्र, त्यांना संधी दिली नाही. दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी घोषित केल्यानंतर अजित पवार यांनी ही बाब राहुल नार्वेकर यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. ‘सत्ताधारी पक्षाच्या १४ सदस्यांना बोलण्याची संधी दिली जाते. आमच्याकडून भास्कर जाधव यांना या प्रकरणी बोलण्याची संधी द्या,’ अशी मागणी पवार यांनी केली. तेव्हा नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेता म्हणून आपल्याला बोलण्याची संधी दिली आहे. आता पुरवणी मागण्यांवर बोला, असा सल्ला देत नार्वेकर यांनी पुढील कामकाज पुकारले. दरम्यानच्या काळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार आपापल्या जागा सोडून पुढे आले होते. सभागृहात गोंधळाची स्थिती होती; तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांनी अध्यक्षांना उद्देशून एक असंसदीय शब्द वापरला. याच मुद्द्यावरुन जयंत पाटील यांचं निलंबन केलं गेलं.

Source link

ajit pawarJayant Patiljayant patil suspensionSharad Pawarsharad pawar call ajit pawarअजित पवारजयंत पाटीलजयंत पाटील निलंबनशरद पवार
Comments (0)
Add Comment