मध्यरात्री ३ वाजता आयआयटीचा विद्यार्थी आपल्या मैत्रिणीसोबत सानपाडा परिसरात फेरफटका मारत होता. मात्र फेरफटका मारत असताना एका पोलीस कॉन्स्टेबलकडून सदर तरुणीची विचारपूस करत मोबाईल क्रमांक मागण्यात आला. विद्यार्थिनीने मोबाईल क्रमांक देण्यास नकार दिल्यावर आरोपी पोलीस कॉन्स्टेबल दीपक राठोड याने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे.
या घटनेनंतर तरुणीने सर्वप्रथम सानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सानपाडा पोलिसांनी पीडित तरुणीला घाबरवत तक्रार न करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे पीडित विद्यार्थीनीने आयआयटी कॉलेज कॅम्पसमध्ये आल्यावर घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पवई पोलीस ठाण्यात या घटनेसंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, पवई पोलिसांनी कॉन्स्टेबल दीपक राठोडविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून सदर गुन्हा सानपाडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. त्यानंतर दीपक राठोड याला अटक करून पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलं आहे. तसंच राठोड याला निलंबितही करण्यात आलं आहे. एका पोलीस कॉन्स्टेबलनेच आयआयटी क्षेत्रातील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.