सण उत्सवाला आपल्या संस्कृतीत काळा रंग काही ठिकाणी चालत नाही, काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे काही भागात वर्ज मानतात. परंतू, काळ्या रंगानं शुभ-अशुभच्या कल्पना मोडीस काढल्या असून, कुठलाही सण असो वा घरगुती कार्यक्रम, ऑफिस पार्टी यांना आवर्जून काळा रंग असलेल्या साड्या आणि ड्रेसला प्राधान्य दिलं जातं. गूढ, आक्रमक, नकारात्मकता आणि शोकाचं प्रतिनिधित्व करणारा असला तरीही काळ्या रंगाचं आकर्षण काही कमी झालेलं नाही. त्यामुळंच काळ्या रंगाची किमया तरुणींवर आजही कायम आहे. मकरसंक्रांतीला हा रंग आवर्जून परिधान केला जातो.
यामुळे काळे कपडे परिधान करतात
हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला ऋतुमानानुसार महत्व आहे आणि त्यामागे काही धार्मिक आणि नैसर्गिक कारणं देखील आहेत. हा दिवस आणि रात्र हिवाळ्यातील सर्वात थंड आणि खूप मोठी असते. त्यामुळे या मोठ्या रात्रीच्या काळोखाला निरोप देण्यासाठी या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात अशी मान्यता आहे.
काळ्या रंगाची वस्त्रे ही बाहेरची ऊष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला म्हणजेच मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा आहे. दिनमान वाढत जाण्याच्या आनंदाप्रीत्यर्थ पतंग उडवण्याची प्रथा आहे. थंडीच्या दिवसांत तीळ हे शरीराच्या आरोग्याला उपयुक्त असतात. वर्षभरात कुणाशी मतभेद, भांडणे झाली असतील, अबोला धरला गेला असेल; तर तिळगूळ देऊन हितसंबंध सुधारावेत आणि तिळगूळ घ्या गोड गोड बोला असा निरोप द्यावा.
काळी साडी अन् हलव्याचे दागिने
नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी व हलव्याचे दागिने भेट दिली जातात. बाळाच्या पहिल्या संक्रांतीनिमित्त त्यालाही काळ्या रंगाचे कपडे व हलव्याचे दागिने घातले जातात. त्यामुळं या वस्तूंची खरेदी संक्रातीला प्रामुख्याने केली जाते. हलव्याचे तयार दागिनेही बाजारात उपलब्ध असून त्यात हार, नेकलेस, कानातले, बिंदी, बांगड्या, कंबरपट्टा, बाजूबंद, मंगळसूत्र, कानाचे वेल, मुकूट असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. याशिवाय आपल्या मागणीनुसार दागिने तयार करुन दिले जात आहेत.
मकर संक्रांत कशी साजरी करावी?
- मकर संक्रांतीच्या दिवशी स्नानकरुन सूर्याला अर्घ्य द्यावं.
- श्रीमदभागवतच्या अध्यायाचं किंवा गीतेचं पठण करावं.
- अन्न, चादर आणि तुपाचं दान करावं.
- लाल फूल आणि अक्षता वाहून सुर्याला नमस्कार करुन नैवेद्य द्याव.
- सूर्याच्या बीज मंत्राचा जप करावा.
- “ॐ ह्रां ह्रीं ह्रौं सः सूर्याय नमः”