‘मुंबई टाइम्स कार्निव्हल’ची घोषणा झाल्यापासूनच कॉलेजविश्वात कार्निव्हलची चर्चा रंगते आहे. कार्निव्हलमधील विविध कार्यक्रम, उपक्रम यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये तसेच मनोरंजनविश्वातही उत्सुकता आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’चा नवा सुपरस्मार्ट डिजिटल अवतार ‘मटा गोल्ड’चे उद्घाटनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. मंगळवारी पाटकर कॉलेजमध्ये होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला ‘बिग बॉस मराठी-४’चा विजेता अक्षय केळकरची विशेष उपस्थिती असेल. उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर दुपारी २.३० वाजता विद्यालंकार पॉलिटेक्निकमध्ये ‘लेट्स स्टार्ट’ हा स्टार्टअपविषयक कार्यक्रम होणार आहे. स्टार्टअपविश्वात यशस्वी ठरलेले मान्यवर यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. यानंतर बुधवार, ११ जानेवारी रोजी ठाण्यातील जोशी-बेडेकर कॉलेजमध्ये ‘इन्फ्लुएन्सर्स’शी गप्पा रंगतील. तर, तरुण रंगकर्मींना हक्काचे व्यासपीठ देणाऱ्या ‘नाट्यरंग’मध्ये श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात चार एकांकिका सादर होतील. शुक्रवारी विरारच्या विवा कॉलेजमध्ये ‘स्टार उद्याचे’मध्ये तरुण कलाकार त्यांचे कलागुण सादर करतील. तर शनिवारी रुईया कॉलेजमध्ये मराठी कलाकारांमध्ये विविध खेळ रंगतील. १६ जानेवारीला सुप्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक नागराज मंजुळे हे वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. तसेच प्रसिद्ध कवी-अभिनेता किशोर कदम याप्रसंगी नागराज मंजुळे यांची मुलाखत घेतील. स्टार्टअपची माहिती, सोशल मीडियामध्ये लोकप्रिय असणाऱ्या ‘इन्फ्लुएन्सर्स’शी गप्पा, तरुण रंगकर्मींचे एकांकिका सादरीकरण यामुळे कॉलेजिअन्सचा सळसळता उत्साह पाहायला मिळणार आहे.
‘बाब्या’च्या नव्या रूपाची उत्सुकता
‘मुंबई टाइम्स कार्निव्हल’चा चेहरा असणाऱ्या ‘बाब्या’च्या नव्या रूपाविषयीही कॉलेज कॅम्पसमध्ये उत्सुकता आहे. कार्निव्हलचा बाब्या नव्या रूपात कॉलेज विद्यार्थ्यांसमोर येणार आहे.