मोदी मुंबईत येणार म्हणून फडणवीस दावोसला जाणार नाहीत; संजय राऊतांनी सुनावले

मुंबई: मेट्रो प्रकल्प आणि इतर विकासकामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १९ जानेवारी मुंबईत येणार आहेत. यावेळी त्यांच्या स्वागताला उपस्थित राहता यावे, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेला जाण्याचा कार्यक्रम रद्द करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिष्टमंडळ घेऊन दावोसला जातील. परंतु, देवेंद्र फडणवीस यांना अर्थकारण आणि उद्योगाची असलेली सखोल जाण पाहता त्यांनी दावोस येथील परिषदेला हजर राहणे राज्याच्यादृष्टीने महत्त्वाचे होते. परंतु, भाजपमधील सर्वोच्च नेते असलेल्या पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतच थांबण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वादाला सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्याविषयी राज्य सरकार अजिबात गंभीर नाही. पंतप्रधान हे आपलेच आहेत, ते येत-जात असतात. पण एकदा गेलेली गुंतवणुकीची संधी परत येणार नाही, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. पंतप्रधान मुंबईत येणार आहेत, ही चांगली गोष्ट आहे. पण दावोस परिषदेसाठी देशातील जवळपास सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि त्यांची शिष्टमंडळे जाणार आहेत. गुजरातचे लोक पण तिकडे जाणार आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीसांनी पंतप्रधान मोदींना मेट्रोच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पुढे ढकलण्याची विनंती करायला पाहिजे होती. पंतप्रधान कार्यालयाने कार्यक्रमासाठी दुसरी तारीख दिली असती. पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना गुंतवणुकीपेक्षा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जास्त चिंता आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

पंतप्रधान मोदी हे अत्यंत चांगले व्यक्ती आहेत, त्यांचं महाराष्ट्रावर प्रेमही आहे. विनंती केली असती तर मोदींनी पुढची तारीख दिली असती. पण दावोस परिषदेची तारीख पुन्हा मिळणार नाही. शिंदे आणि फडणवीस पहिले राजकारण करतात आणि नंतर राज्याला प्राधान्य देतात. महाराष्ट्रातील गुंतवणुकीचा टक्का घसरत आहे, त्याकडे शिंदे-फडणवीसांनी लक्ष दिले पाहिजे. पंतप्रधान हे आपलेच आहेत, ते येत-जात असतात. पण गेलेली गुंतवणूक पुन्हा येत नाही. मोदी अवघ्या काही तासांसाठी मुंबईत येत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणासाठीच हा दौरा असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.

माझ्याऐवजी मुख्यमंत्री शिंदे दावोसला जातील: फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण दावोस परिषदेला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’शी बोलताना त्यांनी सांगितले की, मी दावोसला जाणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिकडे जातील, असे त्यांनी सांगितले. त्याऐवजी देवेंद्र फडणवीस १६ आणि १७ जानेवारीला दिल्लीत होणाऱ्या भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थिती लावणार आहेत.

गेल्या काही काळात राज्यातील अनेक बडे प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने राजकीय संघर्ष रंगला होता. या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर टीका झाली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा दावोस परिषदेला न जाण्याचा निर्णय वादग्रस्त ठरु शकतो. देवेंद्र फडणवीस हे अर्थमंत्री आहेत. त्यांना अर्थकारण आणि उद्योगासंबंधी चांगली जाण असल्यामुळे दावोसमधील उद्योगपतींशी वाटाघाटी करण्यात फडणवीस महत्त्वाची भूमिका बजावू शकले असते.

Source link

davos meetDevendra Fadnavismaharashtra investmentNarendra Modipm narendra modi in mumbaiSanjay Rautदावोस आर्थिक परिषददेवेंद्र फडणवीससंजय राऊत
Comments (0)
Add Comment