शिंदे गटात प्रवेश, दोनच दिवसांत हत्या, ५ महिने झाले तरी मृत्यूचं गूढ उकलेना, आता पोलिसांनी……

अकोला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील अकोल्याच्या शिवसेना उपशहर प्रमुखाची गळा आवळून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह तलावात फेकून देण्यात आला होता. भागवत अजाबराव देशमुख (चव्हाण) (वय २८, राहणार कौलखेड, अकोला) असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. दरम्यान, या हत्याकांडाला आता पाच महिने होत आहेत, जवळपास २५ संशयित लोकांची तपासणी झाली. तरीही पोलीस तपासात काहीही निष्पन्न झालेले नाहीये. अखेर अकोला पोलिसांनी या प्रकरणात माहिती देणाऱ्या व्यक्तीला आकर्षण बक्षीस जाहीर केले आहे. तसेच त्याचं नाव गुपित ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी कळवले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

२७ ऑगस्ट २०२२ ला अकोला जिल्ह्यातील पातुर पोलीस स्टेशन हद्दीतील कापशीच्या तलावात अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला. त्याचा मृतदेह वैद्यकीय चाचणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. मात्र, वैद्यकीय तपासणीच्या अहवालात या व्यक्तीची हत्या झाल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात खुनाचे गुन्हे दाखल केले. दरम्यान, तलावाच्या पाण्यात दोन दिवसापासून मृतदेह पडून असल्याने युवकाची ओळख पटवणे पोलिसांसाठी कठीण होते. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर २९ ऑगस्टलाच अंत्यसंस्कार केले. दुसऱ्या दिवशी म्हणजे ३० ऑगस्टला पुन्हा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तलावाच्या परिसरातील पाहणी केली. तेव्हा ५०० किमी अंतरावर एका रुमालमध्ये आधार कार्ड आणि इतर काही वस्तू आढळून आल्या. या संदर्भात पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तो युवक बेपत्ता असल्याची तक्रार अकोल्यातीलच खदान पोलीस स्टेशन इथे दाखल होती. त्यामुळे भागवत अजाबराव देशमुख अशी या युवकाची ओळख पटली.

पोलिसांनी जाहीर केले आकर्षण बक्षीस

भागवत देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला पाच महिने होतायत. भागवत मोबाईल वापरत नसल्यामुळे तपासात अनेक अडचणी येत आहेत. तसेच या हत्या प्रकरणात आतापर्यंत २५ हून अधिक संशयित लोकांची कसून चौकशी झाली. तरीही पोलिसांना तपासात हत्येचा सुगावा लागला नाही. अखेर पोलिसांनी भागवत देशमुख हत्या प्रकरणात माहिती देणाऱ्या व्यक्तीला आकर्षण बक्षीस तसेच त्याचं नाव गुपित ठेवण्यात येईल, असे पातुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हरीश गवळी यांनी ‘मटा ऑनलाइन’शी बोलताना कळविले आहे.

भागवत २५ ऑगस्ट पासून होता बेपत्ता

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, भागवत देशमुख २५ ऑगस्ट २०२२ रोजी पासून बेपत्ता होता, त्याचा अनेक ठिकाणी शोध घेतला, मात्र कुठलाही सुगावा हाती लागला नव्हता. अखेरीस नातेवाईकांनी भागवत बेपत्ता असल्याची तक्रार खदान पोलीस ठाण्यात दाखल दिली. दरम्यान, ३१ ऑगस्टला पोलिसांनी नातेवाईकांना या संदर्भात माहिती दिली की भागवत याची हत्या झाली असून तेव्हा कुठलीही ओळख न पटल्याने पोलिसांकडून त्याच्यावर अंत्यविधी केले. हे समजताच कुटुंबीयांना धक्का बसला होता. दरम्यान भागवतच्या हत्या प्रकरणातील दोषींवर कठोर करावी करावी, अशी मागणीही नातेवाईकांनी केली.

आधी गळा आवळला, नंतर मृतदेह तलावात फेकला…

पातुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भागवत देशमुख याची अज्ञात व्यक्तींनी आधी गळा आवळून हत्या केली, त्यानंतर त्याचा मृतदेह तलावात फेकून दिला, असं वैद्यकीय अहवालात समोर आला आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींच्या विरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.

भागवत देशमुख नेमके कोण आहेत?

भागवत देशमुख सुरुवातीला शिवसेनेचे अकोल्याचे माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांचे वाहन चालक म्हणून होते. दरम्यान, काही वर्षानंतर भागवतने आपला प्रवास राजकीय क्षेत्रात वळविला. २३ ऑगस्ट २०२२ रोजी अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात भागवतने प्रवेश केला. शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरीया यांच्या निवासस्थानी त्याने जाहीर प्रवेश केला होता. त्याच्या खांद्यावर शिंदे गटातील शिवसेना उपशहर प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली होती. प्रवेशानंतर दोन दिवसातच त्याची हत्या झाली.

Source link

akola crimeakola crime newsAkola policebhagwat deshmukh chavan murder casebhagwat deshmukh murdershinde campअकोला क्राईमअकोला पोलीसभागवत देशमुख खून प्रकरणभागवत देशमुख मृत्यू
Comments (0)
Add Comment