या मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारासाठी पटोले अहमदनगरला आले होते. त्यावेळी त्यांनी आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. स्वत: उमेदवार पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा ग्रामीण जिल्ह्याचे प्रभारी अध्यक्ष किरण काळे यांच्यासह तिन्ही पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. दोनच दिवसांपूर्वी पटोले यांनी जिल्ह्याची काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त केली आहे. त्यानंतर झालेल्या या बैठकीला जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थि होते.
बैठकीनंतर पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांच्यासंबंधी आणि त्यानंतर त्यांना पाठिंबा देणाऱ्यांसंबंधी निर्णय घेताना पक्षाची काहीही चूक झालेली नाही. पक्षाचे नियम आणि शिस्तीप्रमाणेच सर्व प्रक्रिया झाली आहे. तांबे यांना भाजपचा पाठिंबा असणार याची कुणकुण आधीच लागली होती. आता भाजपने पाठिंबा दिला की नाही, हे मला माहिती नाही. थोरात सध्या आजारी असल्याने रुग्णालयात आहेत. त्यामुळे ते जाहीरपणे भूमिका मांडू शकत नसतील. मात्र, माझे त्यांच्याशी जे बोलणे झाले, त्यानुसार ते पक्षासोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांना मी आदेश देऊ शकत नाही. त्यांनीच पक्षाची भूमिका समजावून घेऊन तशी कृती करणे अपेक्षित आहे. तसे ते करतील असे मला वाटते. जे कोणी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतील, त्यांच्यावर कारवाई केली जाणारच. तशी ती करण्यात आली आहे. त्यामुळेच नगरच्या जिल्हाध्यक्षाला निलंबित आणि कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे” असेही पटोले म्हणाले.
भाजपसंबंधी पटोले म्हणाले, या मतदारसंघात केवळ काँग्रेसलाच प्रश्न विचारले जात आहेत. भाजपला का त्यांची भूमिका विचारली जात नाही? त्यांनी या निवडणुकीत उमेदवार का दिला नाही? पाच जिल्ह्यांत त्यांना कोणीही लायक उमेदवार मिळाला नाही का? त्यांना तांबेंना उमेदवारी द्यायची होती तर ती का दिली नाही? आताही उघड पाठिंबा का जाहीर करीत नाहीत? याची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत. भाजपने तांबे यांना उघड पाठिंबा दिला तर त्याचे आम्ही स्वागतच करतो” असेही पटोले म्हणाले.
‘वंचित’ची युती शिवसेनेसोबत : पटोले
वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत आल्यानंतरही नाशिक पदवीधर मतदारसंघातील वंचितचा उमेदवार कायम आहे, यासंबंधी विचारले असता पटोले म्हणाले, “आम्ही आधीपासून सांगत आहोत की वंचितची युती शिवसेनेसोबत झाली आहे. त्यांच्या यासंबंधीच्या बैठकांना किंवा घोषणेच्यावेळीही आम्ही उपस्थित नव्हतो. त्यामुळे वंचितला महाविकास आघाडीचा घटक म्हणता येणार नाही. त्यामुळे त्यांच्या उमेदवारासंबंधी शिवसेनेने ठरवायचे आहे”, असेही पटोले म्हणाले.