संपूर्ण देशभरात गाजलेल्या पुण्यातील अभियंता मोहसीन शेख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाईसह वीस जणांवर हत्येचा आरोप होता. पुणे सत्र न्यायालयाने आज या आरोपातून धनंजय देसाईसह सगळ्यांची निर्दोष मुक्तता केलीये. पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या मोहसीन शेखची जमावाने २ जून २०१४ रोजी हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाईसह २१ जणांना येरवड्यातून अटक केली होती. हडपसरमध्ये दोन जून २०१४ला दंगल उसळली होती. यात मोहसीन शेखचा मृत्यू झाला होता.
मोहसीनच्या कुटुंबाला घेऊन उच्च न्यायालयात जाणार
जमियत-ए-उलेमा या संघटनेच्या मौलाना इब्राहिम जाहुरकर यांनी कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना मोहसीनच्या कुटुंबाला घेऊन उच्च न्यायालयात जाणार असल्याचं सांगितलं. पुणे कोर्टावर मोठा विश्वास होता. मोहसीनच्या संशयित मारेकऱ्यांना शिक्षा होईल, अशी आम्हाला आशा होती. पण त्यांना निर्दोष सोडण्यात आलं. मोहसीनच्या कुटुंबाच्या पदरी निराशा पडलीये. आता आम्हाला सगळ्यांना प्रश्न पडलाय की मोहसीनची हत्या नेमकी कुणी केली? असा सवाल जमियत-ए-उलेमाने केला आहे.