कोश्यारी महाराष्ट्रातून निघून गेले तर आम्हाला आनंदच होईल; शरद पवार स्पष्टच बोलले

Maharashtra Politics | गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले या महनीय व्यक्तींविरुद्ध त्यांनी केलेल्या वक्तव्यांवर विरोधकांनी त्यांच्याविरोधात आणि भाजपविरोधात रान उठवले होते. कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन हटवण्याची मागणी लावून धरण्यात आली होती. यानंतर कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदींना भेटून राज्यपाल पदावरुन पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

 

भगतसिंह कोश्यारी आणि शरद पवार

हायलाइट्स:

  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कोणत्याही क्षणी पदमुक्त होणार?
  • महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण?
कोल्हापूर: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून महाराष्ट्राची सुटका झाली तर ती आनंदाची बाब ठरेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन दूर करण्यात येणार असल्याची चर्चा आम्ही ऐकली आहे. आमच्याकडेही ठोस माहिती नाही. पण एवढंच सांगतो, या सगळ्यात एकच गोष्ट चांगली होईल. आताचे जे राज्यपाल आहेत, त्यांच्यापासून महाराष्ट्राती सुटका झाली तर आम्हाला आनंदच होईल, असे शरद पवार यांनी म्हटले. शरद पवार हे शनिवारी सकाळी कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी ठाकरे-वंचित युती, महाराष्ट्र आणि देशाचे राजकारण अशा सर्वच मुद्द्यांवर सविस्तरपणे भूमिका मांडली.

यावेळी शरद पवार यांनी इंडिया टुडे आणि सी व्होटरकडून करण्यात आलेल्या ‘मूड ऑफ नेशन’ या सर्वेक्षणाच्या निकालांबाबतही भाष्य केले. ‘मूड ऑफ नेशन’च्या सर्वेक्षणानुसार लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३४ जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे सध्या विरोधकांच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. याविषयी बोलताना शरद पवार यांनी म्हटले की, इंडिया टुडे आणि सी व्होटरने यापूर्वी केलेली सर्वेक्षणे अचूक ठरली आहेत. मी त्यांच्यावर एकदम विश्वास टाकणार नाही. पण या सर्वेक्षणाने सगळ्यांना दिशा दाखवली आहे. ती दिशा सत्ताधारी पक्षाला सोयीची नाही. कर्नाटकमध्ये भाजपचे राज्य राहणार नाही, त्याठिकाणी लोक परिवर्तनासाठी उत्सुक आहेत. अन्य राज्यांमध्येही अशीच परिस्थिती असू शकते, अशी शक्यता यावेळी शरद पवार यांनी बोलून दाखवली.
Bhagat Singh Koshyari: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अचानक निवृत्तीचे वेध का लागले? राजकीय वर्तुळात कुजबुज
या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला महाविकास आघाडीत सामील करुन घेण्यास राष्ट्रवादीचा विरोध आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी म्हटले की, आमची आणि प्रकाश आंबेडकर यांची चर्चाच झालेली नाही. त्यामुळे त्यांच्याबाबत काही हरकत असण्याचा मुद्दाच नाही, असे पवार यांनी सांगितले.

कॅप्टन अमरिंदर सिंग महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?

भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावेळी राज्यपाल पदावरुन पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मला उर्वरित आयुष्य वाचन, मनन आणि चिंतनात व्यतीत करायचे असल्याचे त्यांनी पंतप्रधान मोदी यांना सांगितले होते. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या जागी महाराष्ट्राचा नवा राज्यपाल म्हणून कोणाची नेमणूक होणार, याबद्दल चर्चा सुरु झाली होती. त्यांच्याजागी पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि माजी काँग्रेस नेते कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder singh) यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
कोश्यारी आणि वाद! मोदींजवळ पदमुक्त होण्याची इच्छा मांडणाऱ्या राज्यपालांची वादग्रस्त वक्तव्यं
पंतप्रधान मोदी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी ७५ सदस्यीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत अनेक राज्यांमध्ये राज्यपाल आणि उपराज्यपालांच्या बदल्या आणि नियुक्त्यांसंदर्भात चर्चा होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात येत्या १५ दिवसांत नव्या राज्यपालांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. राजस्थान भाजपमधील ज्येष्ठ नेते ओम माथुर, कॅप्टन अमरिंदरसिंग, प्रभात झा आणि लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची नावे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाच्या शर्यतीमध्ये आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

amarinder singhBhagat Singh Koshyarimaharashtra governormaharashtra new governorMaharashtra politicsncpSharad Pawarभगतसिंह कोश्यारीमहाराष्ट्र राज्यपालशरद पवार
Comments (0)
Add Comment