मुंबईतील टोलेजंग इमारतींमधील अग्निशमन यंत्रणा ठप्प; १४७ पैकी ६३ इमारतींना नोटीस

मुंबई : गेल्या काही वर्षांत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः बहुमजली इमारतींत आगीच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमन दलाने गेल्या महिन्यात १४७ इमारतींच्या केलेल्या पाहणीत तब्बल ६३ इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा ठप्प असल्याचे आढळून आले. इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्यासाठी या इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विहित मुदतीत सुधारणा न झाल्यास कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे अग्निशमन दलाने म्हटले आहे.

दुर्घटना घडल्यानंतर अनेक ठिकाणी तेथील अग्निशमन यंत्रणा ठप्प असल्याचे निदर्शनास येते. या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण सोसायट्या, इमारती, हॉटेल्स, सरकारी, खासगी कार्यालये, रुग्णालये आदी ठिकाणी अग्निशमन यंत्रणा कायद्यानुसार अद्ययावत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र अनेकांकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे ही यंत्रणा कार्यान्वित केली की, नाही याची तपासणी करण्यासाठी मुंबई अग्निशमन दलातर्फे अचानक पाहणी केली जाते. डिसेंबरमध्ये केलेल्या तपासणी मोहिमेत अनेक इमारती आणि हॉटेलांमध्ये अग्निसुरक्षेसंबंधित त्रुटी आढळून आल्या.

गेल्या वर्षभरात लालबाग येथील वन अविघ्न पार्क टॉवरमध्ये दोन वेळा आग लागली. टॉवरमध्ये अग्निशमन यंत्रणा सुरू असल्याने आग वेळेत आटोक्यात आणणे अग्निशमन दलाला शक्य झाले. या पाठोपाठ कांदिवली, बोरिवली, वरळी, वडाळा यासह विविध भागांत आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलातर्फे डिसेंबरमध्ये दोनवेळा सुमारे १४७ इमारतींमध्ये अचानक तपासणी करण्यात आली. बहुसंख्य इमारतींमध्ये सदोष इलेक्ट्रिक वायरिंगमुळे आगीच्या दुर्घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे.

अग्निशमन दलाने नोटीस बजावल्यानंतर ६०, ९० व १२० दिवसांत अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याची मुदत दिली जाते. या मुदतीत सुधारणा न झाल्यास वीज व जलजोडणी खंडित करण्याचा इशारा मुंबई अग्निशमन दलाने दिला आहे. ८० टक्के आगीच्या घटना सदोष वायरिंगमुळे लागत असल्याने घर, कार्यालये किंवा हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये सजावटीसाठी ज्वलनशील पदार्थांचा वापर करू नये, असे आवाहन अग्निशमन दलाने केले आहे.

पाहणी आणि नोटिसा

२ डिसेंबर २०२२

९८ सोसायट्यांची तपासणी

४० इमारतींना नोटीस

२८ डिसेंबर २०२२

५९ इमारतींची झाडाझडती

२३ इमारतींना नोटिसा

अग्निशमन कायदा २००६ नुसार कारवाई

कलम ८१ (१) : नोटीस दिली जाते

८२ (२) : वीज, जलजोडणी कापण्याचा इशारा

८३ (३) संबंधित आस्थापना सील करण्यात येते

Source link

Increase in fire incidentsmumbai building fire auditMumbai Fire Brigademumbai newsUse of flammable materials
Comments (0)
Add Comment