लातूरमध्ये पुन्हा ‘श्रावणी’ नको, आई-वडिलांचा आक्रोश; शिक्षकाला अटक करण्याची मागणी

अहिल्या कसपटे: लातूर: शिक्षणाची पंढरी म्हणून लातूरने शिक्षण क्षेत्रात एक वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे. पण, इथे खासगी शिकवणीची जीवघेणी स्पर्धा सुरू झाली असून विद्यार्थ्यांचे बळी घेतले जात आहेत. श्रावणी नाईकनवरे ही त्यापैकीच एक. मात्र, यापुढे तरी पुन्हा कोणी विद्यार्थी ‘श्रावणी’ होऊ नये म्हणून आंदोलन छेडण्याचा इशारा श्रावणीच्या पालकांनी दिला आहे. जो पर्यंत त्या शिक्षकाला अटक केली जात नाही, त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जात नाही, श्रावणीला न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलाय.

शहरातील किड्स इंफो पार्क या औसा रोडवर असणाऱ्या शाळेत एका शिक्षकाने इयत्ता नववीच्या वर्गात शिकणाऱ्या श्रावणी नाईकनवरे या विद्यार्थिनीचा ‘कॉपी गर्ल’ म्हणून उल्लेख केला होता. त्यामुळे अपमानित झाल्याची तीव्र भावना मनात घेऊन श्रावणी वावरत होती. ही घटना घडल्यापासून ती उदास होती. तिचे कशातच मान रमत नव्हते. शाळेत जाणे तिला नकोसे झाले होते. आपला एवढा मोठा गुन्हा होता का सगळ्यांसमोर अपमानित करण्यासारखा, असा प्रश्न तिला पडत होता. आपण त्या शिक्षकाकडे लावलेली खासगी शिकवणी सोडली हेच यामागचे खरे कारण आहे, असे तिला जाणवत होते.

हेही वाचा -जेली चॉकलेट बाळाच्या घशात अडकलं, आईनं प्रयत्नांची शर्थ केली, पण जे व्हायला नको तेच घडलं

शिकवणी सोडल्यापासून त्या शिक्षकाच्या वागणुकीतील बदल तिला स्पष्टपणे जाणवत होता. तिला मानसिक त्रास दिला जात असल्याचे तिला कळत होते. त्यामुळे श्रावणी मानसिक तणावाखाली होती. त्यात या कॉपी प्रकरणाने ती आणखीच खचली आणि अखेर त्या शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून तिने सुसाईड नोट लिहून जगाचा निरोप घेतला, असा आरोप श्रावणीच्या आई- वडिलांनी पत्र-परिषदेत केला आहे.

लातूरमध्ये शहरातील किंवा ग्रामीण भागातीलच नव्हे तर राज्यभरातील पालक आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी लातूरला पाठवतात. पण इथे खासगी शिकवणीची जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. त्यातल्या त्यात शिक्षकांनीच खासगी शिकवणी घ्यावी आणि शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्याकडे खासगी शिकवणी लावावी असे अप्रत्यक्ष बंधन घालणे गंभीरच आहे. हे एवढ्यावरच न थांबता अशा शिक्षकांकडे खासगी शिकवणी न लावणाऱ्या विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देणे हे अतिशय भयंकर आहे. या अशा मुल्यहीन व्यवस्थेचा श्रावणी बळी ठरली आहे, असा आरोप श्रावणीच्या पालकांनी केला आहे.

हेही वाचा -लाँग ड्राईव्हसाठी निघाला डॉक्टर, मध्येच थांबला; ४० लाखांची मर्सिडीज पेटवली, कारण…

तसेच, यापुढे अन्य कोणत्या विद्यार्थ्याचा श्रावणी सारखा बळी जाऊ नये यासाठी त्या शिक्षकाला अटक करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्या शिक्षकाला अटक झाली नाही, त्याच्यावर योग्य ती कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे. आता त्या शिक्षकाला अटक होणार का, शाळा प्रशासन त्याच्यावर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

Source link

copy in examlatur copy girl caselatur latest newslatur live newsLatur Newslatur shravani death caseshravani lost lifeteacher studentकॉपी गर्ल प्रकरणलातूर न्यूज
Comments (0)
Add Comment