अंत्ययात्रेत मंगलाष्टका म्हटल्या, अक्षताही टाकल्या, पोराच्या जाण्याने आईवर नको ती वेळ…

जळगाव : जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथे अपस्मार आजाराने १९ वर्षीय तरुणाचे निधन झाले. रघुवीर मनोज सोनवणे असे मयत मुलाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी रघुवीर याची बहिण तर कोरोना काशात त्यांच्या वडिलांचेही निधन झाले. आता एकुलता एक मुलगा रघुवीरचाही मृत्यू झाल्याने आईचा जगण्याचा आधार हिरावला असून मातेचा आक्रोश बघून सर्वांचे डोळे पाणावले होते.

जामनेर तालुक्यातील पहूर येथे सोनवणे कुटुंबीय वास्तव्यास आहे. या कुटुंबात तीन वर्षांपूर्वी सोनवणे यांची मुलगी रोहिणी अठरा वर्षांची असताना अपस्मार आजाराने मृत्युमुखी पडली. पती मनोज रमेश सोनवणे यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांचाही मृत्यू झाला. मुलगी आणि पत्नी गमावल्याचे दु:ख विसरत असताना, शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास अपस्मार आजाराने रघुवीर याचेही निधन झाले.

पती व मुलीच्या निधनानंतर रघुवीर हा रंजना सोनवणे यांच्या जगण्याचा आधार होता. या एकुलत्या एक मुलाला शिकवून बँकेत अधिकारी बनवावं असे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मातेला मात्र त्याच्याच अंत्ययात्रेत मंगल अक्षता टाकण्याची दुर्दैवी वेळ आली .

रघुवीर मनोज सोनवणे हा गेल्या अडीच महिन्यांपासून तो अंथरुणावर खिळून होता. शेंदुर्णी येथील शेठ राजमल ललवानी उच्च माध्यमिक विद्यालयात वाणिज्य शाखेत त्याने गेल्या वर्षी बारावी परीक्षेचा फॉर्म भरला होता. मात्र परीक्षेदरम्यानच तो उपचार घेत असल्याने त्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. कोरोनाची लागण झाल्याचे कळताच पतीला वाचविण्यासाठी अल्पभूधारक रंजना सोनवणे यांनी शेती विकून उपचार केले. परंतु दुर्दैवाने पतीचे प्राण त्या वाचवू शकल्या नाहीत .

अंत्यविधीत मंगलाष्टकांचे स्वर… उपस्थितांचे मने हेलावली

मुलगी आणि पती वियोगाचे दुःख उराशी कवटाळून मुलगा रघुवीर यास बँकेत अधिकारी बनविण्याचे त्यांचे स्वप्न होते .परंतु नियतीला ते मान्य नसेल म्हणून की काय आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास रघुवीरची प्राणज्योत मालवली. रंजना सोनवणे यांनी मुलगा रघुवीर याला बरे करण्यासाठी मोलमजुरी करून जळगाव, औरंगाबाद, मुंबई येथील दवाखान्यांमध्ये उपचार केले. मात्र त्यांना अपयश आले व त्याचा याच आजाराने जीव घेतला.

तरुण असल्याने मृत्यू पश्चात रघुवीरचे सुपारीशी लग्न लावण्यात आले. यावेळी टाहो फोडत आई रंजना सोनवणे यांनी भरल्या डोळ्यांनी अक्षता टाकल्या. अंत्ययात्रेतील मंगलाष्टकाचे स्वर कानी पडल्याने तसेच आईचा आक्रोश पाहून उपस्थितांची मने हेलावून गेल्याचं पहायला मिळालं. या घटनेने संपूर्ण जामनेर तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Source link

jamner newsraghuvir sonawanewedding ritualsyoung man deathअंत्ययात्रेत मंगलाष्टकाजामनेर बातमीरघुवीर सोनवणे
Comments (0)
Add Comment