आयएएस अधिकारी मणिराम शर्मा यांची कहाणी आपण जाणून घेत आहोत. मणिराम शर्मा हे राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील बंदनगढ़ी गावचे रहिवासी आहेत. मणिरामचे वडील मोलमजुरी करायचे तर आईला दृष्टी नव्हती. एवढेच नव्हे तर मणिराम यांना स्वतःलाही ऐकू येत नव्हते. त्यांना अभ्यासाची खूप आवड होती पण गावात शाळा नसल्याने अभ्यास करणे खूप अवघड होते. अभ्यासासाठी ते दररोज ५ किलोमीटर चालत शाळेत जायचे.
मेहनतीचे फळ गोड असते, असे म्हणतात. मणिराम यांनी प्रचंड मेहनत घेत अभ्यास केला. त्यावेळी त्यांनी राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षेत पाचवा आणि बारावीच्या परीक्षेत सातवा क्रमांक पटकावला होता. मणिराम दहावी पास झाल्याचे कळल्यावर त्यांच्या वडीलांवर खूप आनंद झाला. वडिलांनी मणिराम यांना आपल्या ओळखीच्या एका अधिकाऱ्याकडे नेले. माझा मुलगा दहावी पास झाला आहे, त्याला शिपाई म्हणून नोकरी द्या, असे त्यांनी अधिकाऱ्याला सांगितले. त्यावेळी अधिकाऱ्यांच्या बोलण्यानंतर मणिराम यांच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते म्हणाले ‘मणिरामला ऐकू येत नाही. त्यामुळे घंटा किंवा कोणाचा आवाज त्याला ऐकू येणार नाही. तो शिपाई कसा बनू शकतो?’
राज्यात लिपिक परीक्षा उत्तीर्ण
त्यानंतर त्यांनी अलवर कॉलेजमधून पुढील शिक्षण घेतले. मुलांची शिकवणी घेतली. त्यातूनच त्यांनी खर्च चालवला. लिपिकाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांना पीएचडी शिष्यवृत्ती मिळाली. त्यानंतर त्यांनी आयएएस होण्याचा निर्णय घेतला.
मणिराम यांनी २००५ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. बहिरेपणामुळे त्यांना नोकरी मिळू शकली नाही. २००६ मध्ये पुन्हा परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांना पोस्ट आणि टेलिग्राफ खात्याची नोकरी मिळाली. दरम्यान कानाच्या ऑपरेशननंतर त्यांना ऐकू येऊ लागले. २००९ मध्ये त्यांनी पुन्हा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन ते आयएएस झाले.