गांधीभूमीत आजपासून ९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; मात्र वादांची परंपराही कायम

राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी (वर्धा) : पाच दशकांहून अधिक काळानंतर वर्ध्यात आज, शुक्रवारपासून ९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे. सकाळी १०.३० वाजता संमेलनाचे उद्‌घाटन होणार आहे. यंदाच्या संमेलनामध्ये वर्ध्याच्या भूमीचा वैचारिक वारसा जपत प्रबोधनपर आणि वैचारिक कार्यक्रमांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. या तीन दिवसांत साहित्यिक चर्चा, वैचारिक परिसंवादासह विविध सत्रे होणार आहेत. याद्वारे वैचारिक मंथनाबरोबरच ‘नई तालीम’ मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर हे संमेलन होत आहे. ज्येष्ठ विचारवंत-लेखक न्या. नरेंद्र चपळगावकर हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. मावळते अध्यक्ष भारत सासणे यांच्याकडून ते सूत्रे स्वीकारतील. संमेलनाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाषामंत्री दीपक केसरकर, ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे हे प्रमुख पाहुणे आहेत. शताब्दी वर्षानिमित्त विदर्भ साहित्य संघातर्फे हे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे संमेलन होत आहे. माजी खासदार दत्ता मेघे हे स्वागताध्यक्ष, तर विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते हे संमेलनाचे कार्याध्यक्ष आहेत.

संमेलन परिसरात आचार्य विनोबा भावे मुख्य सभामंडप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथप्रदर्शन, ग. त्र्यं. माडखोलकर प्रकाशन मंच, मनोहर म्हैसाळकर सभामंडप, प्रा. देविदास सोटे कविकट्टा, कविवर्य सुरेश भट गझल कट्टा, वा. रा. मोडक बालसाहित्य मंच, मावशी केळकर वाचनमंच सजले आहेत. कविकट्टा, गझलकट्टा, वाचनकट्टा, प्रकाशनकट्टा रंगणार आहे. बोली भाषांपासून समाज माध्यमांतील अभिव्यक्तीपर्यंत विविध विषयांवर तीन दिवसांमध्ये परिसंवाद रंगतील.

साहित्यनगरी २३ एकर परिसरामध्ये पसरली आहे. मुख्य प्रवेशद्वार सूत कातणाऱ्या महात्मा गांधींच्या प्रतिकृतीने सजले आहे. प्रवेशद्वारावर ‘सार्थ तुकाराम गाथा’, ‘सत्याचे प्रयोग’, ‘सार्थ श्रीज्ञानेश्वरी’, ‘विनोबा भावे’ या पुस्तकांची मुखपृष्ठे आहेत. संमेलनाच्या पूर्वसंध्येला भारत सासणे यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शन आणि प्रकाशन मंचाचे उद्घाटन झाले.

वर्ध्यात साहित्य संमेलन होत आहे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. लोकांच्या मनामध्ये गांधी आणि विनोबा भावे यांची स्मृती असणे ही अतिशय चांगली गोष्ट आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सांभाळणे म्हणजे एक जबाबदारीचे काम आहे.

– न्या. नरेंद्र चपळगावकर, नियोजित संमेलनाध्यक्ष

वादांची परंपरा कायम

– गांधीवादी संघटनांचा डावलल्याचा आरोप

– पूर्वसंध्येला ग्रंथप्रदर्शन आणि प्रकाशन मंचाचे उद्‌घाटन

– निघणार ग्रंथ दिंडी; सुरक्षेच्या कारणास्तव ऐनवेळी मार्ग बदलला

– उद्‌घाटन समारंभातून ‘वर्धा गौरव गीत’ बाद

Source link

akhil bhartiya marathi sahitya sammelanwardha news updatesअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनवर्धा बातम्यासाहित्य संमेलन वाद
Comments (0)
Add Comment