गोपीचंद पडळकरांची अजित पवारांवर खालच्या भाषेत टीका, म्हणाले…

पुणे: संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत, असं म्हणणाऱ्यांची कदाचित सुंता झाली असावी, अशी शेलकी टीका भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्यावरुन प्रचंड गदारोळ झाला होता. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, त्यांना धर्मवीर म्हणू नका. त्यांना कोणत्याही एका धर्माशी जोडणे उचित ठरणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी राज्यभरात रान उठवले होते. त्यानंतर अनेक दिवस यावरुन मोर्चे, आंदोलनं, आरोप-प्रत्यारोप सुरु होते. हा वाद आता कुठे शमतो न शमतो तोच भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हा मुद्दा पुन्हा उकरून काढला आहे. यावरुन अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडताना गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत खालच्या पातळीला जाऊन वक्तव्य केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

गोपीचंद पडळकर यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केले. संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत, असं जे कोणी म्हणतायत त्यांची कदाचित सुंता झाली असेल. ज्यांना असं वाटतंय, त्यांची परिस्थिती आता जाऊन तपासली पाहिजे, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. गोपीचंद पडळकर यांच्या या शेलक्या भाषेमुळे पुन्हा एकदा वाट पेटण्याची शक्यता आहे.

अजित पवार आणि गोपीचंद पडळकर यांनी यापूर्वीही एकमेकांवर अनेकदा तिखट भाषेत टीका केली आहे. गोपीचंद पडळकर हे सातत्याने पवार घराण्याचा डिवचताना दिसतात. यावर अजित पवार हेदेखील चोख प्रत्युत्तर देतात. गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याविरुद्ध बारामतीमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत पडळकर यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. तेव्हा अजित पवार यांनी मी डिपॉझिट जप्त झालेल्यांवर बोलत नाही, अशी खोचक टीका अनेकदा केली आहे.

कोण कुठला उपटसुंभ, त्याच्यावर बोलायला मी रिकामा नाही: अजित पवार

काही दिवसांपूर्वीच गोपीचंद पडळकर यांनी बारामतीमधून पवारांचं घराणं उखडून फेकणार, असे वक्तव्य केले होते. त्यावर अजित पवार चांगलेच संतापले होते. तुम्ही ज्या माणसाबद्दल मला प्रश्न विचारताय तो फार मोठा नेता नाही. त्याने बोलावं आणि मी उत्तर द्यावं, असं होणार नाही. कोण कुठला उपटसुंभ, त्याचं डिपॉझिट जप्त करुन मी त्याला पाठवलंय, असे अजित पवार यांनी म्हटले होते.

Source link

ajit pawarbjpdharmaveer sambhaji maharajGopichand Padalkargopichand padalkar ajit pawargopichand padalkar controversial statementpune local newsअजित पवार धर्मवीर सुंताधर्मवीर अजित पवार
Comments (0)
Add Comment