समृद्धी महामार्ग होणार हायटेक; रेस्तराँ, हॉटेल, मार्केट अन् पेट्रोल पंप उभारण्याच्या हालचाली

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर लवकरच २० ठिकाणी विशेष सुविधा उभ्या राहणार आहेत. त्यासाठी जमीनमालकांकडून जमिनी मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डीदरम्यान गेल्यावर्षी सुरू झाला. मात्र अद्याप त्यावर महामार्गासाठी आवश्यक पुरेशा सुविधा अद्याप उभ्या झालेल्या नाहीत. इंधन पंपांपासून ते हॉटेल, रेस्तराँ, स्वच्छतागृह, खरेदीची ठिकाणे, वाहन दुरुस्ती केंद्रे आदी त्या ठिकाणी नाहीत. त्यामुळेच या महामार्गावर प्रवास करणे वाहनचालकांसाठी तसे जिकीरीचे ठरते. आता मात्र लवकरच या महामार्गावर सुविधा उभारणीसाठी रस्ते विकास महामंडळाने हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी महामंडळाने ‘लँड पुलिंग’ योजनेचा अवलंब केला आहे. संबंधित जमीन मालकांकडून जमीन घेऊन त्या विकसित करायच्या, जमिनीची मालकी मात्र त्यांच्याकडेच कायम ठेवायची, अशी ती योजना आहे. यानंतर ही जमीन विविध सुविधा उभारणीसाठी कंत्राटदारांना भाडेतत्त्वावर द्यायची, अशी योजना यासाठी महामंडळाने आखली आहे.

या योजनेंतर्गत आमने, मराळ, डवाळा, मांडवा, दाव्हा, शिवनी, रेंकापूर व वायफळ या आठ ठिकाणी मुंबई-नागपूर व नागपूर-मुंबई या दोन्ही मार्गांवर प्रत्येकी ४ हेक्टरवर सुविधांची उभारणी होणार आहे. एका बाजूने आठ म्हणजेच एकूण १६ ठिकाणी अशा सुविधा असतील. प्रत्येक ठिकाणासाठी किमान ५० कोटी रुपयांचा खर्च संबंधित विकासक व कंत्राटदाराला करायचा आहे. यासाठी पाच वर्षांचा कालवधी निश्चित करण्यात आला आहे. निविदा भरण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी आहे.

१ हजार कोटींची गुंतवणूक

अशाच सुविधांसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील वरझाडी व नाशिक जिल्ह्यातही १० ते १२ हेक्टर जमिनीचा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ शोध घेत आहे. त्या जमिनीवरदेखील ५० कोटी रुपये खर्चून विकासकांना सुविधांची उभारणी करायची आहे. २० फेब्रुवारी ही त्यासंबंधीच्या निविदेची अखेरची तारीख आहे. अशाप्रकारे समृद्धी महामार्गावरील सुविधेपोटी किमान १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य रस्ते विकास महामंडळ पुढील पाच वर्षांत करणार आहे.

Source link

Maharashtra Samruddhi Mahamargsamruddhi mahamargsamruddhi mahamarg mapsamruddhi mahamarg nagpurमुंबई नागपूर समृद्धी महामार्ग
Comments (0)
Add Comment