काही दिवसांपूर्वी बीडमध्ये मोठ्या हौसेने आणलेली नवरी करवलीसह पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना नवरदेवाने पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन केली होती. बनावट लग्न करुन पळून जाणारी टोळी यानिमित्ताने समोर आली होती. पोलिसांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतलं होतं. यानिमित्ताने बनावट लग्न करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला होता. तब्बल ११ आरोपींचा यात सहभाग होता. या केसमध्ये सध्या रुग्णालयातून पळून गेलेली पूजा हीच मुख्य आरोपी आहे.
याच केसमध्ये पूजा पोलिसांच्या ताब्यात होती. परंतु ९ महिन्यांची गर्भवती असल्याने तिला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेली २ दिवस पोलिसांच्या तावडीतून निसटण्याचा प्लॅन तिच्या डोक्यात सुरु होता. जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्याचा डोळा चुकवून तिने तेथून पळ काढला.
पूजा बीड जिल्हा रुग्णालयातून कशी पळाली?
पोलिसांच्या ताब्यात असलेली पूजा गर्भवती असल्याने तिला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लघुशंकेला जाण्याचा बहाणा करून ती वॉशरुमकडे गेली. पोलिसांचं लक्ष चुकवून तिने तिथूनच पोबारा केला. अर्धा तास झालं तरी पूजा आली नसल्याने महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी वॉशरुमकडे धाव घेतली. नंतर पूजाने पलायन केल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
पोलिसांच्या हातावर तुरी देणारी पूजा लग्नाळू तरुणांच्या फसवणुकीचे गुन्हे करणारी सराईत आरोपी आहे. बीड शहर, नेकनूर, बैठाणा ठाण्यातील विविध गुन्ह्यात तिला पोलिसांनी बेड्याही ठोकल्या होत्या. औरंगाबादच्या पैठण पोलीस स्टेशनमध्ये तिच्यासह तिचा पती कचरूलाल तुळशीराम निलपत्रेवार याच्यावर गुन्हा नोंद आहे.