आज जालन्यातील जामवाडी येथील रंगनाथराव पाटील परीक्षा केंद्रावर हिंदी विषयाच्या परीक्षेसाठी एकही विद्यार्थी फिरकला नाही.त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोलीस, केंद्रप्रमुख यांच्यासह सर्वांना ताटकळत बसावं लागलं.
आज बारावीचा हिंदी विषयाचा पेपर होता. या परीक्षा केंद्रावर हिंदी हा विषय दोनच विद्यार्थ्यांनी घेतलेला होता. मात्र केंद्रप्रमुखांनी दोन्हीही विद्यार्थ्यांना फोन लावून परिक्षेला बोलावले तरीही विद्यार्थी परीक्षेसाठी आले नाहीत.त्यामुळे परीक्षा केंद्रावर परीक्षा वेळेत शुकशुकाट पाहायला मिळाला. एकही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी न आल्यानं शिक्षकांना देखील पेपर न घेताच रिकाम्या हातानं परीक्षा केंद्रावरून मागे परतावं लागलं. अशी प्रतिक्रिया जामवाडी परिक्षा केंद्रातील परीक्षा पर्यवेक्षक एम.एस.लहांडगे यांनी दिली.
हिंदी प्रश्नपत्रिकेत चूक
बारावीच्या विद्यार्थ्यांना हिंदी विषयाची प्रश्नपत्रिका हाती आली. हिंदी विषयाच्या या प्रश्नपत्रिकेत दोन प्रश्नांमध्ये उपप्रश्न क्रमांक चुकीचे देण्यात आल्याचे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले. नेमका उपप्रश्न क्रमांक काय टाकायचा?असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला. बोर्डाकडून बरेच दिवस आधीपासून बारावी परीक्षांची तयारी सुरु होते. असे असताना या चुका वारंवार का होतात? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक दोनमध्ये चार शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे होते. या शब्दांचे क्रमांक १,२,३,४ असे असणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र १,२,१,२ असे क्रमांक देण्यात आले. एवढंच नव्हे तर समानार्थी शब्द लिहिण्यासाठी प्रश्नामध्ये देखील घोळ पाहायला मिळाला. येथे दिलेल्या चारही शब्दांना देखील १,२,३,४ असे प्रश्न क्रमांक अपेक्षित असताना त्याऐवजी १,१,१,१ हे प्रश्न क्रमांक देण्यात आले होते.